Pimpri Acb Raid News : सत्ताधारी भाजपची नाचक्की!
टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी 10 लाखांची लाच मागितली
1 लाख 18 हजार रूपये स्विकारताना
एसीबीची कारवाई
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना अटक

Pckhabar- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कामाचे मंजूर झालेले टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने नऊ लाखांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि तीन लिपिकांना अटक केली आहे. ही कारवाई आज बुधवार पिंपरी चिंचवड महापालिकेत करण्यात आली. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर धाड पडल्याने सत्ताधारी भाजपसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सभापती अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी 24 वर्षीय ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार
केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
यातील तक्रारदार हे जाहिरातीचा ठेकेदार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या जागेमध्ये होडींग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या २८ निविदा मंजूर झालेल्या आहेत. परंतु त्यांची वर्कऑर्डर अद्याप न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले असता वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाउंट) टक्के रक्कम १० लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडीअंती २ टक्केप्रमाणे सहा लाख रुपये घेण्याचे मान्य केले. ६ लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी आजरोजी तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता २ टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्यामार्फत स्वीकारल्यावर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीमती सीमा मेहेंदळे,पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक श्री. गिरीष सोनवणे, पोलीस हवालदार अश्पाक इनामदार, पोलीस नाईक अविनाश इंगुळकर, पोलीस हवालदार श्रीमती सरिता वेताळ, पोलीस हवालदार अंकुश माने, पोलीस शिपाई चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.
अधिक तपास पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, ला.प्र.वि. पुणे या करत आहेत.






Leave a Reply