Lonavala News : दोन दिवसात पर्यटकांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा दंड वसूल
Pckhabar- पर्यटनस्थळ बंदी असताना देखील नियम मोडत लोणावळा ग्रामीण परिसरातील पर्यटनस्थळ भागात शनिवार व रविवार निमित्त आखाड पार्टी साजरी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे .
विनामास्क फिरणाऱ्या तब्बल 361 पर्यटकांकडून 1 लाख 80 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे . तर विनाकारण फिरणाऱ्या 7 पर्यटकांकडून प्रत्येकी 1 हजार रुपये प्रमाणे 7000 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय . मुजावर यांनी दिली .
कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध अद्याप शिथिल केलेले नाहीत . तर पर्यटनस्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत . या नियमांची मागील दोन महिन्यांपासून कडक अंमलबजावणी केली जात असली तरी काही हौशी पर्यटक नियमांचे उल्लंघन करत पर्यटनस्थळांकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत . वारंवार सूचना देऊन देखील पर्यटक नियमांचा भंग करतात , कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेकजण मास्क न वापरता विनामास्क फिरताना मिळून येत आहेत .
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी.वाय . मुजावर यांच्या टीमने शनिवारी विनामास्क फिरणाऱ्या 156 जणांवर तर रविवारी विनामास्क फिरणाऱ्या 205 जणांवर कारवाई केली . ऐवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी नागरिक विनामास्क फिरणार असतील तर कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे . मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहेत . त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घ्यावी . मास्कचा कटाक्षांने वापर करावा व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मुजावर यांनी केले आहे .










Leave a Reply