Talegaon Dabhade News : अधिकार्यांची नियुक्ती करा, अन्यथा नगरपरिषदेला टाळे लावा
उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांची संतप्त मागणी
Pckhabar-तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला गेल्या काही दिवसांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी व महत्वाच्या विभागाचे अधिकारीच नाहीत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज होत नसून छोट्या-छोट्या कामाला नागरिकांना वारंवार खेटे मारावे लागत आहे. राज्य शासनाने नगरपरिषदेला मुख्याधिकार्यांसह इतर विभागांच्या अधिकार्यांची तातडीने नियुक्ती करावी, अन्यथा शासनाने नगरपरिषदेला टाळे लावावे, अशी संतप्त मागणी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे यांनी आज (शुक्रवार) केली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत मुख्याधिकारी, मुख्यालेखापाल, नगररचनाकार, पाणी पुरवठा विभाग प्रमुखांसह 14 अधिकार्यांच्या जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाज, विकास कामे होत नाही. प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्यांचा कोणाला कोणाचा पायपोस नाही. अधिकारी, कर्मचारी नगरपरिषदेत कधीही येतात जातात. यामुळे नगरपरिषदेत कामासाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुख्याधिकारी म्हणून शाम पोशेट्टी यांची नेमणूक झाली होती. त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने त्यांचे निलंबन झाले आहे. त्यांच्या जागी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. 2016 पासून नगरपरिषदेला आत्तापर्यंत सात मुख्याधिकारी लाभल्यामुळे तळेगाव शहराच्या विकासाचा बट्याबोळ झाला आहे. परिषदेचा कारभार प्रभारीच्या माध्यमातून सुरू आहे.










Leave a Reply