Pune News : घरावर दरड कोसळलेल्या कुटुंबांची आमदार महादेव जानकर यांनी घेतली भेट
शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन
Pckhabar-अतिवृष्टीमुळे दरड कोसळून घर वाहून गेलेल्या लवासा दासवे येथील कुटुंबांची राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी भेट घेत त्यांना मदतीचा हात दिला. तसेच या कुटुंबांपर्यंत शासकीय यंत्रणा पोहोचल्या नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासनही या कुटुंबियांना आमदार जानकर यांनी दिले.
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे लवासा दासवे येथील
मुलाजी मरगळे आणि बाळू मरगळे या दोघांच्या घरावर डोंगर कोसळला. त्यात त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून ते यातून वाचले. मात्र, जनावरे, शेती, घराचे व घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मरगळे कुटुंब रस्त्यावर आले आहे. 26 जुलै रोजी रात्री तीन वाजता हा प्रकार घडूनही अद्यापपर्यंत शासकीय यंत्रणा या घरापर्यंत पोहोचू शकली नाही. विशेष म्हणजे लवासा सिटीच्या बाजूलाच ही घटना घडली आहे.
मरगळे कुटुंबांना न्याय मिळावा, यासाठी आमदार महादेव जानकर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आप्पा सुतार, पुणे शहराध्यक्ष विनायक रुपनवर, पुणे संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, आण्णासाहेब रुपनवर, सविता जोशी, बालाजी पवार, भाऊ आखाडे, भानुप्रिया पेद्दी, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा ऍड. राजश्री माने, सोशल मीडिया अध्यक्ष बिरुदेव अनुसे आदींनी येथील कुटुंबांना भेटून मदत केली.
दरम्यान, लवासा सिटी प्रकल्पामुळे येथील कुटुंबांना बदली जमीन देण्याचे मान्य करण्यात आले होते, परंतु लवासा सिटी कॉर्पोरेशनने मरगळे कुटुंबांची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळेच हा प्रसंग घडला असल्याचे मरगळे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यांना बदली जमीन मिळवून देण्याचे आश्वासन आमदार जानकर यांनी दिले.










Leave a Reply