Pimpri News : देश, समाज घडविण्यासाठी लोकमान्यांचा मोठा त्याग : महापौर ढोरे
Pckhabar-देश आणि समाज घडविण्यासाठी लोकमान्य टिळक यांचे मोठे योगदान आणि त्याग आहे. आपल्या लेखनीतून लोकमान्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यातून खर्या अर्थाने देश स्वातंत्र्याची प्रेरणा अवघ्या राष्ट्राला दिली, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
दै. केसरीच्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आणि केसरी मराठा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त अण्णा बोदडे, नगरसेविका माधवी राजापुरे, दै. केसरी पिंपरी विभागप्रमुख विजय भोसले, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिका, स्वयंम अस्वार आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे पुढे म्हणाल्या, लोकमान्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून लोकजागृती करत असताना प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी दै. केसरी वृत्तमान पत्रातून जनजागृती करून स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा निर्माण केली. त्यामुळेच आजही शंभर वर्षांनंतर टिळकांच्या विचारांची गरज आहे, हे यामुळे स्पष्ट होत आहे. म्हणूनच नव्या पिढीने लोकमान्यांचा इतिहास वाचून देश भक्तीची भावना मनामध्ये रूजवली पाहिजे, असे आवाहन ढोरे यांनी केले. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके यांनी लोकमान्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सह आयुक्त अण्णा बोदड़े यांनी केले. दै. केसरी पिंपरी विभागप्रमुख विजय भोसले यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. प्रकाश यादव यांनी आभार मानले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम सुऱक्षित अंतर ठेवून पार पडला.










Leave a Reply