Sangvi News : खोदाईचे काम सुरू असताना सीएनजी गॅस पाईप लिकेज
एक जण जखमी, 1 दुचाकी जळून खाक
Pckhabar-स्मार्ट सिटी अंतर्गत फायबर ऑप्टिकसाठी खोदाईचे काम सुरू असताना जेसीबीचा सीएनजी गॅस पाईपलाईनला धक्का लागल्याने आग लागली. या आगीमध्ये एक जण गंभीर भाजला असून एक दुचाकी जळून खाक झाली आहे. ही दुर्घटना पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय जवळ शनिवारी दुपारी घडली.
महेंद्र बानवलीकर (रा.पाषाण) असे भाजलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी माहिती दिली.
पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय जवळ पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत शनिवारी दुपारी फायबर ऑप्टिकसाठी खोदाईचे काम सुरू होते. यावेळी जेसीबीचा जवळून जाणार्या सीएनजी गॅस पाईप लाईनला धक्का लागला. यामुळे गॅस लिकेज होऊन आग लागली. आगीचे लोळ सुमारे 10 ते 12 फुटापर्यंत उंच होते. तेथूनच आपल्या भावाकडे जाणारे महेंद्र बानवलीकर यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. तर एक दुचाकी पुर्णतः जळून खाक झाली आहे. बानवलीकर यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवून आग विझवली. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply