Pimpri News :  ‘वायसीएमएच’मधील कोविड योद्ध्यांना  बेरोजगार करु नका; अन्यथा न्यायालयीन लढाई, रस्त्यावरही  उतरणार

 

Pimpri News :  ‘वायसीएमएच’मधील कोविड योद्ध्यांना  बेरोजगार करु नका; अन्यथा न्यायालयीन लढाई, रस्त्यावरही  उतरणार

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांचा इशारा
Pckhabar- कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणा-या वायसीएम रुग्णालयातील चतृर्थ श्रेणीतील 217 कंत्राटी कर्मचा-यांना महापालिका 1 ऑगस्टपासून बेरोजगार करणार आहे. कोरोना महामारीत काम करणा-या कोणालाही कामावरुन कमी करु नका. त्यांना कायमस्वरुपी कामावर घ्यावे असे केंद्र, राज्य सरकाराचे आदेश असताना महापालिका प्रशासनाने त्याउलट भूमिका घेतली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता  कोरोना योद्धे असलेल्या 217 कर्मचा-यांना कामावरुन कमी केले जात आहे. या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी; अन्यथा न्यायालयीन लढाई लढली जाईल. याशिवाय रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिला.

याबाबत भोसले यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर  कामगारांची बाजू मांडली. सविस्तर चर्चा केली. नव्या कंत्राटाला स्थगिती देण्याची मागणी यशवंतभाऊ भोसले यांनी केली. त्यावर आयुक्त पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

याबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पुण्यातील कामगार उपायुक्त यांच्याकडेही दाद मागितली. त्यावर कंत्राटी कामगारांच्या वेतन, सेवाशर्तींबाबत कामगार कायद्याच्या प्रचलित तरतुदीनुसार समान काम समान वेतनाचे संरक्षण तसेच कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये कामगारांची सेवा सलग राहील. याबाबत उचित कार्यवाही करावी. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नवीन निविदेला स्थगिती द्यावी , असे पत्र कामगार उपायुक्तांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.

याबाबतची माहिती देताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कॉरीडॉर, अंतर्गत, बाह्य परिसरातील रस्ते, गार्डन, डक्ट, ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच रुग्णांची सुश्रुषा, नर्सेस, डॉक्टरांना मदत  आदी कामे  217 कंत्राटी कर्मचा-यांमार्फत केली जात होती. 2005 पासून सुमारे 16 वर्षे ते कर्मचारी काम करत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची रक्ताची नाती देखील दूर जात असताना कोरोना समर्पित वायसीएमएचमध्ये या चतृर्थ श्रेणीतील कर्मचा-यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. कोरोना बाधित रुग्णांची सेवा केली. त्यांचा देवदूत, कोरोना योद्ध्ये म्हणून गौरव, कौतुक केले गेले. त्यामुळे कोरोना काळात कंत्राटी कामगारांना बेरोजगार करु नये, त्यांची वेतन कपात करु नये असे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय, राज्याचा उद्योग, उर्जा मंत्रालयाचे आदेश आहेत.

असे असताना आणि  कोरोनाची परिस्थिती संपलेली नसताना त्या कर्मता-यांना सेवेत काम करुन त्यांचा गौरव करण्याऐवजी महापालिका प्रशासनाने या कर्मचा-यांना थेट कामावरुन काढून टाकण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. कामगारांना वा-यावर सोडले, असा आरोप यशवंतभाऊ यांनी केला.

महापालिकेने 22 जुलै रोजी वायसीएममधील सफाईचे काम श्री कृपा सर्व्हिसेस यांना दिले. 1 ऑगस्टपासून कामाची वर्क ऑर्डर दिली. पूर्वीच्या कामगारांना 20 ते 21 हजार रुपये वेतन दिले जात होते आणि हा कंत्राटदार  महिना 10 ते 12 हजार रुपये वेतन देणार आहे. कामावर 165 कामगारच ठेवणार आहे. नवीन कंत्राटदार कमी वेतनात काम करणार असल्यामुळे महापालिकेने त्यांना काम देऊन समान काम समान वेतन या कायद्याचे उल्लंघन केले आहे. पालिकेने कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगारांचे वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार 20 ते 21 हजार रुपये वेतन कंत्राटी कर्मचा-यांना दिले जाते. असे असताना महापालिकेने स्वत:च्या निर्णयात बदल केला आहे. समान काम समान वेतन या न्यायालयाच्या आदेशाचेही उल्लंघन केले.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व तपासून पाहून निर्णय घेतो, असे आश्वासन दिले आहे. आयुक्त पाटील हे देशावर प्रेम करणारे प्रशासनातील एक जाँबाज  अधिकारी आहेत. नक्षलीसारख्या देशद्रोह्यांच्या विरोधात लढणारे ते एक मोठे योद्धे आहेत. ते या कोरोना योद्ध्यांवर  अन्याय होऊ देणार नाहीत, याची खात्री असल्याचा विश्वास देखील यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकापरिषदेत व्यक्त केला.

नव्या निविदेला आयुक्तांनी स्थगिती द्यावी.  217 कंत्राटी कर्मचा-यांना यापुढेही कामावर कायम ठेवावे; अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढा लढण्यात येईल. न्यायालयाच्या निर्णयाच्या अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येईल. तसेच 1 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरुन कामगारांसह तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यशवंतभाऊ भोसले यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *