Pimpri News : अनधिकृत टपर्‍या, बांधकामांवर पालिका करणार कारवाई  

Pimpri News : अनधिकृत टपर्‍या, बांधकामांवर पालिका करणार कारवाई
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अनधिकृत टपर्‍या बांधकामे, फलक यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे.

 सध्या महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमणविरोधी पथकास प्रत्येकी पाच जादा कर्मचारी देण्यात आले असून यात आवश्यकतेनुसार वाढ केली जाणार आहे. त्यामुळे अतिक्रमण दूर होऊन शहर सुंदर करण्यास सहाय्य होणार आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.

महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन तेथील नगरसेवक व अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. रस्ते व पदपथावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आदेश महापौर ढोरे व आयुक्त पाटील यांनी संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिले आहेत. मात्र, क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडे पुरेसा प्रमाणात मनुष्यबळ नसल्याने कारवाईस मर्यादा पडत असल्याची बाब क्षेत्रीय अधिकार्‍यांनी आयुक्तांच्या निर्देशनास आणून दिली.

आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकास जादा मजूर व रखवालदार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व 8 क्षेत्रीय कार्यालय पथकांना प्रत्येकी 5 कर्मचारी देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार कर्मचार्‍यांची संख्या वाढविली जाणार आहे. त्या आधारे कारवाई मोहिम तीव्र केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *