Pimpri News : अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्याप्रमाणे नियमित करता येणार नाहीत

Pimpri News : अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्याप्रमाणे नियमित करता येणार नाहीत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात झालेली अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्याप्रमाणे अथवा महाराष्ट्र नगर रचना अधिनियमानुसार नियमित करता येणार नाहीत, त्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या धर्तीवर निर्णय शासनाने घेतल्यास पुढील कार्यवाही करणे सुकर होईल असा अभिप्राय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. तसेच या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी शासनाचे मार्गदर्शन मागितले आहे.

महापालिका हद्दीतील निवासी घरांचे उल्हासनगर महापालिकेच्या धर्तीवर गुंठेवारी पद्धतीने नियमितीकरण करावे. तसेच निवासी घरांवरील शास्तीकर सरसकट संपूर्ण माफ करावा, अशी मागणी शिवसेना माजी खासदार गजानन बाबर यांनी 15 सप्टेंबर 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

बाबर यांनी केलेल्या या मागण्यांसंदर्भात नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी दिलीप वणिरे यांनी 15 जून 2021 रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून महापालिकेचा अभिप्राय सरकारला तात्काळ पाठविण्याबाबत आदेश दिले होते. या प्रकरणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 22 जुलै 2021 रोजीच्या पत्राद्वारे अभिप्राय दिला आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात नागरिकांनी छोटे छोटे भुखंड खरेदी करून अवैधपणे बहुमजली बांधकामे केली आहेत. बहूतांशी ठिकाणी रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे रितसर बांधकाम परवानगी देणे शक्य नसल्याने ही बांधकामे गुंठेवारी अधिनियमानुसार नियमित करता येण्यासारखी नाहीत, असे पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *