Pimpri News :’शिक्षणातून स्वकर्तृत्ववान विद्यार्थी तयार व्हावेत’

 

Pimpri News :’शिक्षणातून स्वकर्तृत्ववान विद्यार्थी तयार व्हावेत’

कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

Pckhabar- आजचे शिक्षण हे उत्तम माणूस घडविणारे असावे. शिक्षणातून स्वकर्तृत्ववान विद्यार्थी तयार व्हावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार अश्विनी सातव-डोके यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत शुक्रवारी “व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सातव बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धीची अधिष्ठात्री देवता देवी सरस्वती च्या प्रतिमे चे पूजन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अश्विनी सातव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे , पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना उर्मिला पाटील यांनी भारतीय संस्कृतीत गुरू – शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करत गुरू आपल्याला उत्तम जीवन जगण्यासाठी संस्कारांची शिदोरी भरभरून देतात असे मनोगत व्यक्त केले.

यानंतर विद्यार्थिनी मनोगतामध्ये कु.प्राची खेडेकर,कु अंशु दराडे, कु यादव नंदिनी या विद्यार्थिनींनी जीवनात गुरूंचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व , गुरू -शिष्य नाते , गुरूंनी केलेले संस्कार याविषयी माहिती सांगितली. यानंतर विद्यालयातील उपशिक्षिका शुभांगी दोरगे यांनी शिक्षक मनोगतामध्ये अज्ञानरुपी अंध:कार दूर करून प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या गुरूंचे महत्त्व व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमात एस एस सी परीक्षा एप्रिल 2021 मध्ये उत्तम गुण संपादन करणारी विद्यार्थिनी कु भूमिका यादव हिला विद्यालयातील उपशिक्षक अमृतराव काटकर व उपशिक्षिका अनघा रांगणेकर यांच्या वतीने शाळेपयोगी वस्तू व आर्थिक स्वरूपात बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना बदलत्या शिक्षण पद्धती नुसार विद्यार्थ्यांना स्वकौशल्याची जाणीव करून देत विद्यार्थ्यांतून सुजाण व सुसंकृत दातृत्व शील नागरिक घडविण्याचे कार्य करावे असे अनमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका अनघा रांगणेकर यांनी केले. व विद्यालयातील उपशिक्षिका सविता जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *