स्वच्छंद ॲडवेंचर फाऊंडेशनला स्पिती व्हॅलीमध्ये ऐतिहासिक यश
६,१६० मीटर उंचीच्या अनामिक शिखरावर केली प्रथम चढाई
Pckhabar- स्वच्छंद ॲडवेंचर फाऊंडेशनच्या गिर्यारोहक संघाने हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅली मधील खामेंगर भागात ६,१६० मीटर उंचीच्या अनामिक शिखरावर यशस्वी चढाई केली. दि. १६ जुलै रोजी सकाळी ८:४८ मिनिटांनी ओमहर्ष जपे, संवेद मठपती, तृप्ती जोशी व अनिकेत कुलकर्णी या चार गिर्यारोहकांनी शिखरमाथा गाठला. ही या शिखरावरील प्रथम चढाई आहे.

१ जुलै २०२१ रोजी स्वच्छंद ला ५ वर्ष पूर्ण झाली. या निमित्त हिमाचल प्रदेशच्या स्पिती व्हॅलीतील खामेंगर या अतिशय दुर्गम भागातील या शिखरावर आव्हानात्मक मोहीम आयोजित करण्यात आली होती. यासाठी अनिकेत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ३ गिर्यारोहकांच्या संघाची निवड करण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा या मोहिमेसाठी उत्तम शारीरिक, मानसिक व तांत्रिक तयारी करत संघ मोहिमेसाठी सज्ज झाला. स्वच्छंदच्या अनेक हितचिंतकांनी मदतीचा हात पुढे करत मोहिमेसाठी लागणारा आर्थिक भार पेलला.
३ जुलै रोजी संघ पुण्याहून मानलीमार्गे स्पिती व्हालिकडे रवाना झाला. तेहा या छोट्याश्या खेड्यातून दोन दिवसांचा ट्रेक करून चोम लेक जवळ संघाने बेस कँप लावला. त्यापुढे संघाने क्रमशः ॲडव्हान्स बेस कॅम्प व कॅम्प १ लावत ५,५२६ मीटर वरील समिट कॅम्प गाठला. १६ जुलै ला पहाटे २:३० वाजता उणे तापमानात संघाने शिखरमाथ्याकडे प्रस्थान केले. वाटेतील १०० फूट उंचीची साधारण ५५-६०° ची ice wall, corniced ridge व २०० मीटरचा अतिशय अवघड व धोकादायक traverse पार करत अखेर सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी संपूर्ण संघाला शिखरमाथा गाठण्यात यश आले. शिखरमाथ्यावरून रतांग टॉवर, शिग्री पर्वत, खंग शिलिंग, दिबिबोक्री पिरॅमिड, रतिरूनी पिरॅमिड, कांगला तर्बो, पिन व्हॅलीतील असंख्य अनामिक शिखरं, मनिरांग अशी हिमाचल प्रदेशतील उत्तुंग शिकरांचे दर्शन झाले. परतीच्या वाटेवरील थकवणारा भुसभुशीत बर्फ आणि कॅम्प १ व ॲडव्हान्स कॅम्प मधील धुवाधार वाहणारा ओढा पार करत संघ सुखरूप बेस कॅम्पला परतला. या मोहिमेला हिमाचल प्रदेशातील ‘माउंटन एक्सपीडिशन’ या प्रसिद्ध संस्थेची मोलाची मदत झाली. संघाबरोबरच संस्थेच्या चंदी ठाकूर, इंद्र देव ठाकूर आणि राज कृष्ण या सहकाऱ्यांनीही शिखारमाथा गाठला.

अतिशय दुर्गम भागातील या अनामिक शिखराबद्धल अत्यंत अल्प माहिती उपलब्ध असूनही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या शिखरावर ही प्रथम चढाई असल्यामुळे शिखराचे नामकरण करण्याची संधी स्वच्छंदला मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल आणि प्रस्तावित नाव भारतीय गिर्यारोहण संस्थेकडे पाठवण्यात येईल.
“पहाटेच्या सुमारास समिटच्या वाटेवरी १०० फुटांची ice wall आणि समिट रीज वरील २०० मीटरचा धोकादायक traverse पार करण्याचा अनुभव थरारक होता”
– तृप्ती जोशी
“या मोहिमेत मला प्रथमच route opening करण्याची संधी मिळाली. यासाठी लागणारे शारीरिक बळ आणि तांत्रिक ज्ञानाची प्रतिती आली. पुढील वाटचालीसाठी ही संधी माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाची ठरेल.”
– ओमहर्ष जपे पा
“ही माझी पहिलीच मोहीम होती. पहिल्याच मोहिमेत शिखरमाथा गाठण्याचा थरारक अनुभव अविस्मरणीय होता”
– संवेद मठपती
“खामेंगर व्हॅली हा दुर्गम भाग असून या भागाची अतिशय अल्प माहिती होती. या शिखरावर ही प्रथमच चढाई असल्यामुळे मोहिमेच्या परिणामाबाबत अनिश्चितता होती. त्याचबरोबर covid19 च्या निर्बंधांमुळे मोहिमेच्या पूर्वतयारीस पुरेसा वाव मिळाला नाही. तरीही संपूर्ण संघाने शिखरमाथा गाठल्यामुळे खूप आनंद झाला.”
– अनिकेत कुलकर्णी, मोहिमेचा नेता










Leave a Reply