Article By Dipjyoti Yadav-pawar नारी शक्ति है ,सम्मान है नारी गौरव है, अभिमान है …

Article By Dipjyoti Yadav-pawar
नारी शक्ति है ,सम्मान है
नारी गौरव है, अभिमान है …

Pckhabar- नारी ही अनादी काळाची माता असते, असे म्हणतात. म्हणजेच नारीच्या कुठल्याही रूपामध्ये आपल्याला आईचे रूप दिसते. आई म्हटले की, आपल्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होते. नारीची अनेक रूपे आहेत. आई, बहीण, पत्नी, मुलगी या सगळ्या रूपांमध्ये आपल्याला आईचे प्रतीक दिसत असते. परंतु सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की, आपण या कुठल्याच रूपाचा आदरच करत नाही. स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त उपभोगाची वस्तू आहे, या मानसिकतेमध्ये कसलाच फरक पडला नाही. महिलांविषयी कितीही लेख लिहिले गेले, मालिका चित्रपटामधून कितीही जनजागृती केली, महिला दिनाचा उत्सव साजरा केला काय आणि कितीही चांगले उपक्रम केले काय? समाजातील काही पुरूषांच्या मानसिकतेमध्ये काडीचाही फरक पडताना दिसत नाही. उलट, स्त्रियांच्या शरिराविषयी ’जाणून घेण्याची’ उत्सुकता वाढताना दिसत आहे. स्त्रियांच्या शरिरविषयी जाणून घेण्यासाठी लोक आणखी किती खालच्या पातळीवर उतरतील, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका नामांकित डॉक्टरने आपल्या हाताखाली शिकत असलेल्या महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. अन् महिलांच्या सुरक्षेचा पुन्हा ऐरणीवर आला. अशा प्रकारच्या घटना मोठ-मोठे शोरुम आणि मॉलच्या चेंजिंग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतात. या घटना सर्रासपणे घडत आहेत. ही कुठली हीन दर्जाची मानसिकता आहे हेच कळत नाही. स्त्रियांच्या शारिराविषयी इतके काय आकर्षण असते की, ते बघण्यासाठी माणूस इतक्या खालच्या पातळीवर जात आहे. स्त्रियांच्या शरीराकडे बघून पुरुषांच्या भावना चाळवल्या जाव्यात इतके काय वेगळे असते. इंटरनेटच्या जमान्यात महिलांच्याबाबतीत अनेक चुकीच्या घटना घडू लागल्या आहेत.

आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता हा मुद्दा फक्त चर्चिला जातो. त्याविषयी नुसत्याच चर्चा केल्या जातात. परंतु स्त्री पुरुष समानता तेव्हाच निर्माण होईल जेव्हा स्त्री स्वतः ला बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना देखील सुरक्षित असल्याची भावना तिच्यामध्ये निर्माण होईल. आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्त्री घरात देखील सुरक्षित नाही. स्त्रियांवर अत्याचाराच्या घटना शक्यतो ओळखीच्या लोकांकडून होत असतात. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये निर्माण झाली आहे. परंतु जोपर्यंत पुरुषी मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत स्त्रियांना मोकळेपणाने वावरता येणार नाही. गेल्या कित्येक शतकांपासून स्त्रियांच्या अस्तित्वाची लढाई चालूच आहे. काळानुरूप फक्त या लढाईचे स्वरूप बदलत आहे. आजच्या मॉडर्न जमान्यातही स्त्रियांच्या जन्मापासून ते स्वतः ला सुरक्षित समजेपर्यंत तिची लढाई चालूच आहे. शासनाने स्त्रियांच्या सन्मानासाठी कितीही योजना चालू केल्या. या योजनांवर लाखो करोडो रुपये खर्च केले. तरीही जोपर्यंत पुरुषांना स्त्रियांचा आदर करायला शिकवले जात नाही तोपर्यंत ही स्थिती अशीच राहणार आहे. मुलांना लहानपनापासून स्त्रियांचा आदर करायचे संस्कार दिले तरच ही परिस्थिती बदलू शकते.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिनेत्री हेमांगी कवीने टाकलेल्या पोस्टवर प्रचंड प्रमाणात सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा झाली. कोणी तिच्या या मुद्द्याला कडाडून विरोध केला तर कोणी तिच्या बाजूने मत नोंदविले. परंतु समाजाचा असा एक वर्ग होता की या वर्गाने तिला अतिशय खालच्या पातळीवर उतरून ट्रोल केले. यामध्ये महिलांची संख्या तेवढीच होती जेवढी पुरुषांची होती. तिने मांडलेल्या मुद्द्यामुळे त्या विषयावर चर्चा तरी केली गेली. लोकांनी मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले. जोपर्यंत अशा प्रकारच्या विषयावर मोकळेपणाने चर्चा होणार नाहीत तोपर्यंत पुरुषांच्या मनातील महिलांविषयी असलेले नको ते आकर्षण कमी होणार नाही. किंबहुना स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना देखील कमी होण्यास मदत होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *