Maval News : तुंग किल्याच्या पायथ्याशी 300 मीटर भूस्खलन; दरड कोसळून घर जमीनदोस्त

Pckhabar- दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आज (शनिवार) तुंगमध्ये भूस्खलन झाले आहे. तुंग किल्ल्याच्या पायथ्याच्या लगत असलेल्या तुंग गावात सुमारे 300 मीटर लांब भूस्खलन झाल्यामुळे घरावर दरड कोसळून घर जमीनदोस्त झाले आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. घरातील 11 सदस्य शेतात भात लावणीसाठी गेल्याने सगळ्यांचे प्राण वाचले.

तुंग येथील सीताराम पाठारे यांचे घर व किराणा दुकान जवळच 100 मीटर अंतरावर आहे. सकाळी घरातील सर्व माणस भात लावणी साठी शेतात गेली होती. पाठारे हे एकटेच दुकानात होते. पाऊस जास्त असल्याने दुकानात ग्राहक सनल्याने सकाळी 11 वाजता ते गावात फेरफटका मारायला गेले. ते परत आल्यानंतर राहते घर व दुकान पुरे जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. घरावर दरड कोसळून होत्याचे नव्हते झाले. अन् त्यांना अश्रू अनावर झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

तुंग किल्ला लगत अंदाजे 300 मिटर इतके लांब भूस्खलन झाले असून माळीण दुर्घटनेवेळी व मावळ मधील भाजे दुर्घटनेवेळी देखिल तुंगमध्ये असे मोठे भगदाड पडले होते. यामुळे तुंग गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधीत घटनेची माहिती गावातील नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क करून गावचे ग्रामसेवक भानवसे, तलाठी तसेच अधिकारी यांना कळवली. परंतू सायंकाळी उशिरापर्यंत कुठलीही मदत पोहचलेली नाही.

दैव बलवत्तर, म्हणुन 11 माणसांचे वाचले

पाठारे कुटुंबात 11 माणसे आहेत. यात चार पुरुष, चार महिला व तीन लहान मुले यांचा समावेश आहे. शाळा सुरू नसल्याने पाठारे हे शेतावर जाताना नेहमीच आपल्या मुलांना शेतावरच्या खोपीत घेऊन जात असत. त्यामुळे मुलेही शेतात असल्याने  या कुटुंबाचे दैव बलवत्तर असल्याने सर्वांचे जीव वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *