
Lonavala News : लोणावळ्यामध्ये पावसाचा कहर; हाय अलर्ट जारी
Pckhabar- पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात पावसाने कहर केला असून याठिकाणी बुधवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ८ या २४ तासात ३९० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या ९ तासात १४५ मिमी पाऊस पडला असून लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील अनेक भागामध्ये पाणी भरले असून शहर आणि परिसराला हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे.

हवामान खात्याने आगाऊ दिलेल्या सूचनेनुसार घाटमाथ्यावर असलेल्या लोणावळा शहरात पावसाने मागील दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावलेली आहे. शहरातील सर्वच नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असून यामुळे शहरातील खत्री पार्क, बद्री विशाल सोसायटी, दामोदर कॉलनी, जाधव कॉलनी, आदर्श कॉलनी, निशिगंधा सोसायटी, वर्धमान सोसायटी, पांगोळी, सिद्धिविनायक सोसायटी, खंडाळा, इराणी चाळ, जुना खंडाळा परिसर यासह ग्रामीण भागातील कुसगाव, डोंगरगाव, ओळकाईवाडी, केवरे, कुणे गाव या ठिकाणच्या रहिवासी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी भरण्याच्या घटना घडल्या. बुधवारी मध्यरात्री नंतर घरांमधून अचानक पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांच्या घरात गुढग्यावर पाणी भरल्याने मोठया प्रमाणावर मालमत्ता नुकसान सहन करावे लागेल आहे.

धुव्वादार सुरू असलेल्या पावसामुळे लोणावळा शहरातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण हे त्याच्या पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या हुडको कॉलनी, दामोदर कॉलनी, जी वॉर्ड, इंद्रायणी नगर, खत्री पार्क येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केले आहे. खत्री पार्क मधील नागरिकांची प्रशासनाने शहरातील लोणावळा महाविद्यालयात तात्पुरती व्यवस्था केली असून, नागरिकांना त्याठिकाणी हलवले आहे.
मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा नगरपरिषद, पोलीस प्रशासन या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्यात जुंपले आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या पाच टीम पाच जेसीबी मशीनच्या साहाय्याने रहिवासी परिसरात तसेच रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा निचरा करण्या कामी तैनात करण्यात आल्या आहेत. स्थानिक शिवदुर्ग बचाव पथकातील सदस्य ठिकठिकाणी पाण्याने वेढलेल्या परिसरातील नागरिकांना रेस्क्यू करीत असून नागरिक त्यांना मदत करीत आहे.
मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत
खंडाळा घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या तीनही ट्रॅकवर कर्जत नागनाथ ते मंकीहील परिसरात तसेच खंडाळा बोगद्यापाशी छोट्या मोठ्या दरडी कोसळल्याने या मार्गानं होणारी रेल्वे वाहतूक पुर्णतः बंद झाली होती. या सर्व दरडी ट्रॅक वरून बाजूला करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले. मात्र यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत होत्या.










Leave a Reply