Mumbai News : मुंबईत पावसाचा हाहाकार; दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू


Mumbai News : मुंबईत पावसाचा हाहाकार; दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू

Pckhabar-सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागातील घरावर दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.  काही नागरिकांवर उपचार सुरू आहेत. वाशी नाका, न्यू भारत नगर माहुल इथे ही दुर्घटना घडली.

रात्री एकच्या सुमारास हा दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे झाड पडून भिंतीवर कोसळलं आणि भिंत पडली. राजावाडी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

कांदिवली पूर्व भागात हनुमान नगर भागात पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये घुसलं आहे. सायन, किंग्जसर्कल, लालबाग, प्रभादेवी या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

आयएमडीने रात्री वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे.

रात्रभर झालेल्या पावसामुळे दादर, परळ, सायन, कुर्ला, भांडुप या ठिकाणी पाणी साचल्याने सीएसटी-ठाणे सेवा स्थगित करण्यात आली आहे. ठाणे ते कल्याण आणि त्यापुढील मार्गांवरील सेवा सुरू आहे अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. पावसामुळे सीएसटी-वाशी रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे.

भारतीय हवामान के.एस.होसाळीकर यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार, “रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं आहे. अतिशय अल्प कालावधीत विक्रमी स्वरुपाचा पाऊस झाला आहे. महानगरपालिका आणि राज्याचा आपात्कालीन विभाग यांनी पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत पुरवण्याचं काम सुरू केलं आहे”.

१८ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता सांताक्रुझ इथे 217.5 मिलीमीटर, कुलाबा इथे 178 , महालक्ष्मी इथे 154.5, वांद्रे इथे 202, जुहू विमानतळ 197.5, मीरा रोड 204, दहिसर 249.5, भायंदर इथे 174.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *