
Home Minister News : पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत चार हेक्टर जागा : गृहमंत्री वळसे-पाटील
प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याच्या सुचना
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी चिखली येथे चार हेक्टर जागा देण्याचे प्रस्थावित आहे. नवीन पोलीस भरतीमध्ये पिंपरी आयुक्तालयाला 720 कर्मचारी देण्यात येणार आहे. तसेच पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा, पोलिसांबद्दल नागरिकांचे चांगले मत व्हावे, नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिन्यातून एकदा जनता दरबार घ्यावा, त्यांच्या प्रश्नांचे निराकारण करावे, अशा सुचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना शनिवारी केल्या.
पोलीस आयुक्तालयातील विविध प्रश्नासंदर्भात गृहमंत्री वळसे-पाटील यांनी शनिवारी पोलीस अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर मंत्री पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेय, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ आदी अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 मध्ये पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. सुरूवातीला चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथून आयुक्तालयाचा कारभार सुरू झाला. त्यानंतर महापालिकेच्या प्रेमलोक पार्क येथील शाळेत आयुक्तालय सुरू करण्यात आले. मात्र, ही जागा अपुरी पडत असून पोलीस आयुक्तालय प्रशस्त जागेत व्हावे, अशी मागणी होत आहे.
गृहमंत्री पाटील पुढे म्हणाले, ’’ पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी चिखली येथे चार हेक्टर जागा देण्याचे प्रस्थावित आहे. आयुक्तालयातील अपुरे मनुष्यबळ, वाहने आदींचा बाबींची कार्यवाही सुरू आहे. राज्यात पहिल्या टप्यात 5200 पोलीस भरती केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी आयुक्तालयाला 720 कर्मचारी देण्यात येणार आहेत. दुसर्या टप्यात आणखी 7 हजार पदांची भरती करण्यात येणार असून यामध्ये आयुक्तालयाला कर्मचारी देण्यात येणार आहेत. राज्यातील जेलमधील वाढती कैद्यांची संख्या लक्षात घेता नवीन जेलची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल’’.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा. पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा, पोलिसांबद्दल नागरिकांचे चांगले मत व्हावे, नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्याने महिन्यातून एकदा जनता दरबार घ्यावा. याची तारीख नागरिकांना अगोदर कळविण्यात यावी. नागरिकांनी आपल्या प्रश्नासंदर्भात पोलीसांना अर्ज द्यावा, जेणेकरून प्रश्न सोडविण्यास सोपे होईल. यातून त्यांच्या प्रश्नांचे निराकारण होण्यास मदत होणार आहे. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल एक चांगला दृढ विश्वास निर्माण होईल, असेही गृहमंत्री पाटील म्हणाले.
नागरिकांनी संयम बाळगावा
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेल्या दिड वर्षांपासून सर्व विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिक घरात बसून कंटाळले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट काही देशात आली असून आपल्याकडेही तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. पर्यटन स्थळावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही अनेक नागरिक पर्यटन स्थळावर गर्दी करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जिह्यातील पर्यटन स्थळावर गर्दी न करता संयम बाळगावा. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री वळसे-पाटील यांनी नागरिकांना केले.











Leave a Reply