Article By Dipjyoti Yadav- Pawar: आत्महत्या… एक पाप!
Pckhabar-असे म्हणतात की…चौर्याऐंशी लक्ष योनीमधून गेल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. या मनुष्य जन्माला येण्यासाछी खूप पुण्य करावे लागते. एवढे पुण्य करून मनुष्य जन्म मिळाल्यानंतरही काही जण आत्महत्येसारखे पाप करतात. आत्महत्या म्हणजेच स्वतः स्वतःचे जीवन संपवणे. जीवन संपविल्यानंतर आत्महत्या केलेल्या व्यक्तीची यामधून सुटका होते. मात्र, कुटुंबातील एक व्यक्ती ने आत्महत्या केल्यानंतर कोणाची आई, कोणाचे वडिल, कोणाचा पती, कोणाचा भाऊ जातो तर कुणाच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र कायमचे हरपते. यातून संपूर्ण कुटुंब कोसळते. यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना हजार वेळा विचार करावा.
1 जुलै रोजी देशात सर्वत्र डॉक्टर्स दिन साजरा होत असतानाच पुण्यातील वानवडी आझाद नगर येथे वास्तव्यास असलेल्या डॉक्टर दाम्पत्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. अंकिता निखिल शेंडकर (वय 26) आणि निखिल दत्तात्रय शेंडकर (वय 28) अशी त्यांची नावे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने 29 जून रोजी पुण्यातील स्वप्निल लोणकरने (वय-24) नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना 4 जुलै रोजी माध्यमांमध्ये आल्यानंतर उघडकीस आली. स्वप्निल अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. 5 जुलै रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या व पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी श्रद्धा जायभाय (वय-28) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पंधरा दिवसापुर्वीच चिखलीत एका ज्येष्ठ नागरिकाने आणि मुलाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या सर्व घटना पाहिल्यानंतर आत्महत्या करणार्यांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक सोडले तर 20 ते 30 या वयोगटातील सर्व जण आहे. आयुष्य जगण्याच्या टप्प्यातच उच्च शिक्षित असलेल्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलत असतील, तर अशा शिक्षणाचा काय उपयोग? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
एखादी व्यक्तीला आत्महत्या करण्यास आपल्या आजू-बाजूचा समाज कारणीभूत असतो. समाजामध्ये तीन स्तर आहेत. श्रीमंत, मध्यम आणि गरीब असे तीन स्तर आर्थिक स्थितीनुसार पाडले गेले आहेत. मध्यम वर्गातील लोक श्रीमंत वर्गामध्ये येण्यासाठी प्रयत्न करतात तर गरीब वर्ग मध्यम वर्गामध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या सगळ्या प्रयत्नांमध्ये स्पर्धा प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे. ही स्पर्धाच मनुष्याच्या जीवावर उठली आहे. यातून आपण कुठे कमी पडलो की मनुष्य नैराश्याकडे वळतो, त्याच्या मनात नकारात्मक विचाराचे काहूर सतत येत राहते.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या या जागतिक संकटामुळे अनेकांच्या आयुष्यावर वाईट परिणाम झाला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण चिंताग्रस्त झाले असून भविष्याच्या चिंतेने अनेकांना ग्रासले आहे. यातून नैराश्य वाढण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. या कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसह, महिला, पुरूष घरीच बसून आहेत. कोणी घरून काम करत आहे तर कोणाची नोकरी गेली आहे. या परिस्थितीमध्ये माणूस कामाव्यक्तिरिक्त बाहेर कुठे जाऊ शकत नाही.घरातील सगळेच सदस्य घरामध्येच असल्यामुळे अनेकवेळा वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यातील प्रत्येकालाच वेगळे काम आहे. आणि कामाचा वेगळाच ताण आहे. सतत मोबाईल, लॅपटॉपमध्ये राहून माणसाच्या शारिरीक स्वाथ्यासोबतच मानसिक स्वास्थ देखील बिघडत चालले आहे. छोट्या वादाचे रूपांतर भांडणामध्ये होते आणि या सगळ्याचे पर्यावसन आत्मत्येसारख्या मोठ्या गोष्टींमध्ये होते. या सगळ्या परिस्थितीमधून जात असताना माणसाला मानसिकरित्या ताजेतवाने होण्याची गरज आहे. ही गरज थोडेसे बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन पूर्ण होऊ शकते. परंतू, कोरोना महामारीने मानवाला घरात बंद केले आहे. या कारणामुळेच माणूस नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकत चालला आहे. लॉकडाऊनमध्ये या प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
माणसाची सहनशक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामध्ये नवीन पिढी तर बिलकुल सहनशील नसल्याचे वारंवार दिसून येते. नवीन पिढीला सगळंच इन्स्टंट मिळणाच्या या 21 व्या शतकात यश देखील इन्स्टंटच मिळाले पाहिजे, असे सध्याच्या तरूणाईला वाटत आहे. मात्र, यामध्ये अपयश आले की आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते.
यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. एखाद्या वेळेला अपयश आले म्हणजे संपूर्ण जीवनातच आपले काही खरे नाही, असे म्हणून आत्महत्येकडे वळणे हे पाप आहे. अपयशाची चव चाखल्याशिवाय यशाची चव गोड लागत नाही. त्यामुळे आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाना सामोरे जाताना प्रत्येकाने सकारात्मपणे मार्गक्रमण करून आपले ध्येय साध्य करणे यातच खरा मनुष्य जन्माचा सार दडला आहे!
आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी व्यायाम, प्राणायम, सकस आहार, नात्यांमध्ये सुसंवाद, एकमेकांच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा, स्वतःला वेळ द्या, स्वतःशी बोला, चांगले मित्र-मैत्रिणी जोडून त्यांच्याशी संवाद साधून मनमोकळे करा. समस्या, अडचणी कोणाला नसतात, या पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक सजीवाला समस्या असतात. प्रत्येकाच्या समस्या मात्र वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आत्महत्या करून समस्या सुटत नसून कुटुंबातील इतर सदस्यांच्या समस्यांमध्ये वाढच होत असते. त्यामुळे आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेताना हजार वेळा विचार करा जन हो!
दिपज्योती यादव-पवार










Leave a Reply