Article By Dipjyoti Yadav- Pawar: महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे!
महंगाई डायन खाए जात है
Pckhabar- जगभरात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. संपूर्ण जगासोबतच भारतामध्ये देखील कोरोनाच्या दोन लाटा अगदी जोरदारपणे येऊन गेल्या आहेत. या कोरोनाच्या लाटांनी आपल्या आरोग्य व्यवस्थेचा कस पाहिला. आता तज्ञांनी तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. या कोरोनाच्या वातावरणामध्ये जनता वावरत असतानाच केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेवर महागाईची टांगती तलवार ठेवत आहे. इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, खाद्य तेलाच्या वाढलेल्या प्रचंड किंमती यामुळे सर्व सामान्य नागरिकांना जगण्याची भ्रांत पडली आहे.
एकीकडे कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारने गरिबांसाठी पॅकेज जाहीर केले. मात्र, या पॅकेजमधील रक्कम कोणाला मिळाली, याचा पत्ता नाही. दुसरीकडे अत्यावश्यक वस्तूंसह पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवणे सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल 34 वेळा इंधनाचे दर वाढवून सरकारने महागाईची हद्द पार केली आहे. साधारणपणे दीड वर्षांपासून संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीसोबत लढा देत आहे. या कोरोना कालावधीत झालेल्या टाळेबंदीमुळे कित्येक लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. ज्यांच्या नोकर्या आहेत, त्यांचा पगार कमी केला गेला. लहान-मोठे उद्योग डबघाईला आले. अनेक लघुउद्योग तर अक्षरशः बंद करण्याची वेळ आली.
इंधनाच्या दरवाढीचा भडका
या सगळ्यामध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. ही दरवाढ इतकी झाली आहे की, आता प्रश्न पडायला लागला आहे की, गाडी वापरावी की नाही? सध्या पेट्रोल 105 रू. 35 पैसे तर डिझेल शंभरच्या आसपास आहे. जागतिक बाजार पेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती कमी असून सुध्दा भारतामध्ये इंधन दरवाढ होतीच कशी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडू लागला आहे. इंधन दरवाढ झाल्यानंतर भाजी, दूध, फळे यासारख्या खादद्यपदार्थांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होत असतो. परिणामी या सगळ्या खाद्य पदार्थांच्या किंमती वाढवल्या जातात. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होत असतो. ज्यांचे उत्पन्न थोड़े आहे, त्यांना हा सगळा खर्च परवडणारा नाही. त्या लोकांनी जगायचे कसे?
घरगुती सिलेंडरचे दर भिडले गगनाला
सध्या देशामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर 830 ते 850 रूपये झाले आहेत. गेल्या पाच महिन्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती तब्बल 250 रू. वाढल्या आहेत. ही दरवाढ आता सर्वसामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत बघणारी आहे. येत्या काही दिवसांमध्ये गँस सिलेंडर हजारी पार करतोय की काय? अशी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धास्ती आहे. (गॅसची दरवाढ अशीच सुरू राहिल्यास शहरातील महिला सुध्दा चुलीवर स्वयपांक सुरू करतील तर आश्चर्य वाटायला नको) यामध्ये भर म्हणून की काय केंद्र सरकारने सिलेंडवर मिळणारी सबसिडी देखील बंद केली आहे. ही सबसिडी कधी आणि केव्हा बंद केली, याचा सरकारने सर्वसामान्यांना थांगपत्ताही लागू दिला नाही. मात्र, महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे सरकारने लक्ष न देता गॅस दरवाढ सुरू ठेवली आहे. गॅस सिलेंडरची प्रत्येक घरातील एक गरजेची वस्तू झाली आहे. या दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांवर थेट परिणाम होतो, त्यामुळे या दरवाढीला आता कुठे तरी ब्रेक लावणे गरजेचे आहे.
खासगी शाळांची मनमानी
आपल्याकड़े जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असते. या महागाईच्या शर्यतीमध्ये आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेने देखील उडी घेतली आहे. खासगी शिक्षण संस्थांनी तर आपल्या सगळ्या हदद्च पार केल्या आहेत. सध्या शिक्षण हे शिक्षण राहिले नसून तो एक बाजार झाला आहे. या बाजारामध्ये गुणांना नाही तर डोनेशनला अधिक महत्त्व दिले जात आहे. जो डोनेशऩ जास्त भरेल त्याला अॅडमिशऩ मिळेल, अशी परिस्थिती खासगी शिक्षण संस्थांनी निर्माण केली आहे.
आत्तापर्यंत तर ठीक होते, परंतू, आत्ता सध्या कोरोना महामारीमध्ये सुध्दा या शिक्षण संस्थांनी आपला हा बाजार सुरूच ठेवला आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील आपला पाल्य चांगल्या शाळेमध्ये शिकावा, यासाठी पालकांची धडपड सुरू असते. ऑनलाईन शिक्षण सुरू असून सध्या शाळांकडून भरमसाठ फी आकारली जात आहे. शिक्षण संस्थांच्या बाजूने विचार केला तर त्यांना देखील शिक्षकांचे वेतन इतर बाकीचे खर्च असतात. मात्र, कोरोनापुर्वी असलेली फी आतापण आकारली जात असल्याने हा पालक आणि विद्यार्थ्यावर अन्याय आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी कोरोना, महागाईने आणि लॉकडाऊनमुळे पिचलेल्या पालकांचा विचार करून शालेय फी कमी करणे गरजेचे आहे.
दरम्यान, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन मावळातील खासगी संस्थांची बैठक घेतली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या फी मध्ये सवलत देण्याची मागणी करत तब्बल 35 टक्के सवलत देण्यात आली आहे. याचप्रमाणे राज्यातील विविध खासगी शाळांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सेलिब्रिटींची चुप्पी
देशात महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य जनता होरपळत आहे. असे असताना देशातील सेलिब्रिटी आणि उद्योजक मौन बाळगून आहेत. काँग्रेस (युपीए) सरकारच्या इंधनाचे थोडे तरी दर वाढले की टिवट्वर टिव-टिव करणारे कलाकार आता मात्र उघड्या डोळ्याने सर्व पाहत असूनही शांत आहेत. सरकारने कितीतरी गोष्टींवर निर्बंध आणले आहेत, त्या निर्बधांवर मोठे उद्योजक काहीच बोलायला तयार नाहीत. जे की सर्वसामान्य जनता यांच्यावर अंध विश्वास ठेवत असते.
काँग्रेसचा नाकर्तेपणा
देशात विरोधी पक्ष अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न सध्या पडत आहे. काँग्रेस सारख्या देशभरात सर्वत्र पाळेमुळे रोवलेल्या पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळत नाही, ही शोकांतिका वाढते. देशातील जनता कोरोना, लॉकडाऊन, महागाईने हतबल झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपले भविष्य अंधकारमय वाटू लागले आहे. अशा परिस्थिती केंद्र आणि राज्य सरकारने दिलासा देण्याचे गरजेचे आहे. मात्र, दोन्ही सरकार नागरिकांना दिलासा देण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र, केंद्रातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जास्त आपेक्षा आहेत. मात्र, गेल्या सहा वर्षांत मोदी यांनी कमविलेला लोकांचा विश्वास कोरोना महामारीमुळे गमावला असल्याचे दिसून येत आहे. यातच काँग्रेस सारख्या पक्षाच्या नाकर्तेपणामुळे सरकावर दबाव निर्माण होत नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपची निष्क्रियता जनते समोर येत नाही.
– दिपज्योती यादव-पवार
तळेगाव दाभाडे










Leave a Reply