Akurdi News : स्मार्ट चोऱ्या करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या कुटुंबाची ईडी मार्फत चौकशी करा; जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांची मागणी
स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची कॅगकडे केली तक्रार
Pckhabar- ना भय, ना भ्रष्टाचार, ना खाऊंगा, ना खाने दुंगा अशा वल्गना करणार्या भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कंपनीमार्फत स्मार्ट सिटीच्या कामामध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. 520 कोटीच्या कामात 110 कोटी लाटणार्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्राव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांची आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची कॅगकडे तक्रार केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्मार्ट सिटीतील बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी आकुर्डीतील शिवसेना भवन येथे शहर शिवसेनेच्या नतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. शिवसेना शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, नगरसेविका मिनल यादव, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट आदी यावेळी उपस्थित होते.
सुलभा उबाळे पुढे म्हणाल्या, भाजपचे विधान परिषदचे आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या Krystal Integrated Services Pvt Ltd. या कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटीचे कामकाज दिले आहे. या कंपनीत लाड यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असे चार जण संचालक मंडळावर आहेत. सत्तेचा दुरुउपयोग करून यांनी ठेके मिळविले आहेत. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी 350 कोटी रुपयांची एक निविदा प्रसिद्ध केली होती. ही निविदा 520 कोटी रुपयांना बहाल करण्यात आली. या निविदेत गडबड घोटाळा आहे. पाणी मीटर खरेदीतच पाणी मुरत आहे. खुल्या बाजारात 10 ते 15 हजार रुपयांत मिळणारे 1 पाणी मीटर 1 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. या पाणी मीटरच्या व्यवहारातच सुमारे 72 कोटी 62 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पैशांची अफरातफर आहे.
डिझेल जनरेटर इंस्टॉलेशन करण्याचा दर महिंद्रा कंपनीने 2 कोटी 57 लाख 91 हजार इतका दिला आहे. तर, महिंद्राच्या एमआरपीमध्ये शासनाच्या पोर्टल वर त्यांचा रेट 21 लाख 26 हजार 655 रुपये इतका आहे. येथे 2 कोटी 20 लाख रुपये जास्त दिसून येतात. काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे 25 ते 30 कोटी रुपये दंड लावणे अपेक्षित असताना केवळ काही लाखांचा दंड दाखवण्यात आला आहे. कोरोना सुरू होण्याच्या आधी मुदत संपलेली असताना कोरोनाचे कारण सांगून शासन निर्णयाचा उपयोग करून स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाकडून सल्लागाराने अत्यंत शिताफीने दंड वाचवला असल्याचेही ते म्हणाल्या.
ऑनलाईन Water Quality nalysis STP Monitoring System साठी लागणार्या कंपनीचे Product बसविण्याचा विषय संचालक मंडळापुढे आहे. यात दर्जेदार कंपनी वगळून साध्या कंपनीकडून हे साहित्य घेऊन 10 कोटी लाटण्याचा डाव सुरू आहे. 520 कोटीच्या कामात क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीने 110 कोटी रुपये लाटल्याचा आरोप उबाळे यांनी केली. त्यामुळे या कंपनीची चौकशी व्हावी. त्यांच्या नातलग संचालक पदावर असल्याने आमदार लाड यांची ईडी व कॅग मार्फत चौकशी व्हावी. त्यांचे आमदार पद रद्द व्हावे. अन्यथा आम्हाला न्यायासाठी आंदोलन करावे लागेल असा इशाराही उबाळे यांनी दिला आहे.










Leave a Reply