Dehugaon News: वारीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा – संभाजीराजे
Pckhabar-वारीची परंपरा 350 वर्षांहून अधिक असून वारीनिमित्त 20 लाख लोक एकत्र येतात. ती कशी येतात, याचा अभ्यास व्हावा. वारीच्या परंपरेचा अमूर्त जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून ते केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. तसेच
कोरोना महामारीच्या संकटातून आपल्याला बाहेर पडायचे आहे. सर्व भक्तांना विनंती आहे. आपण जीथे असाल तेथूनच संतश्रेष्ठ तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी आज (गुरुवारी) देहूमधून प्रस्थान झाले. महाराजांच्या पादुकांची खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सपत्नीक महापूजा केली. यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव उपस्थित होते.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले,
युनेस्कोमध्ये जागतिक वारसा हक्कमध्ये दोन प्रकार असतात. टॅनजीबल (मूर्त) वारसा आणि इनटॅनजीबल (अमूर्त) असे प्रकार आहेत. महाराष्ट्रात तीन जागतिक वारसा हक्काची नोंद आहेत. त्यात एलिफंटा लेणी, अजिंठा वेरूळ लेणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे टॅनजीबल वारसा हक्क आहेत. स्पर्श करता येत नाहीत अशांना इनटॅनजीबल म्हणतात. वारीची परंपरा 350 वर्षांहून अधिक आहे. वारीनिमित्त 20 लाख लोक एकत्र येतात. ती कशी येतात, याचा अभ्यास व्हावा. वारीचा अमूर्त जागतिक वारसा हक्कात समावेश व्हावा. यासाठी दोन वर्षांपूर्वी मी हा मुद्दा देशाच्या संसदेत मांडला होता. रायगड किल्ल्यासह तीन ते चार किल्ल्याच्या जागतिक वारसा मूर्त स्थळांमध्ये नोंद व्हावी. यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्याचप्रमाणे तुकोबाराय आणि माऊली यांच्या वारीच्या परंपरेचा अमूर्त जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.










Leave a Reply