Dehu News: श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्या प्रस्थान; कडक बंदोबस्त

Dehu News: श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्या प्रस्थान; कडक बंदोबस्त
Pckhabar-जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. उद्या (गुरूवार)  दुपारी दोन वाजताच्या सुमारास  मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान होणार आहे.

दरम्यान, संत तुकाराम महाराज मंदिर व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मंदिरात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी पालखी सोहळा साध्या पध्दतीने साजरा होत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दुसर्‍या वर्षी आषाढी एकादशीची वारी अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी गावात कोणीही भाविक व वारकर्‍यांना सोडण्यात येणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी केवळ 100 जणांना परवानगी देण्यात आली असून, त्यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान होणार आहे.

सोमवारपासून गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिरात काकडाआरती व अभिषेक महापूजा, साडेचार वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा, पाच वाजता वैंकुठगमन मंदिरातील महापूजा, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची पूजा आदी कार्यक्रम विधिवतपणे पूर्ण करण्यात येणार आहे.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. यानंतर सेवेकरी मसलेकर, श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका श्री विठ्ठल रुख्मिणी यांची भेट घालून कीर्तन मंडपात प्रस्थान ठिकाणी आणतात. हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी सुमारे दोन वाजता प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे. यावेळी
छत्रपती संभाजीराजे महाराज सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. प्रस्थान झाल्यानंतर परंपरेप्रमाणे पादुका पालखीमध्ये ठेवून मंदिराला प्रदक्षिणा होईल. यानंतर पालखी कीर्तन मंडपात ठेवून सायंकाळी सहा वाजता समाज आरती, कीर्तन, जागर होईल, अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *