Talegaon Dabhade News : सेल्फीची हौस बेतली जिवावर!

Talegaon Dabhade News : सेल्फीची हौस बेतली जिवावर !
सेल्फी काढताना वडील, मामा बुडाले, मुलगा बचावला
कुंडमळा येथील घटना
Pckhabar-सेल्फी काढताना सात वर्षांचा मुलगा पाय घसरून पाण्यात पडल्याने त्याला वाचविण्यासाठी वडील आणि मामाने पाण्यात उडी मारली. मात्र, मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडील आणि मामाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर मुलाला  नागरिकांनी सुखरूपपणे बाहेर काढले. ही धक्कादायक घटना इंदुरी येथील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे आज (सोमवार) घडली.

मुलाचे वडील राकेश लक्ष्मण नरवडे (वय-36, रा. मोशी), मुलाचा मामा वैष्णव विनायक भोसले (वय-30, रा. दांगट वस्ती, देहूरोड) या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर मुलगा आयुष राकेश नरवडे (वय-7) हा बचावला आहे.

याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप लोंढे यांनी माहिती दिली. नरवडे, भोसले आणि आयुष हे सोमवारी इंदोरी येथील कुंडमळा येथे फिरण्यास आले होते.

आयुष हा सेल्फी काढत असतानाच त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो पाण्यात पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आयुषचे वडिल राकेश आणि मामा वैष्णव यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, आयुषला वाचविण्यसाठी गेलेल्या राकेश आणि वैष्णव या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आयुषने हातपाय हालविल्याने तो तरगंत होता. उपस्थित नागरिकांनी त्याला त्वरीत पाण्याबाहेर काढले. दोघांचे मृतदेह पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. त्यामुळे सुदुंबरे येथील एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळी धाव घेत नदीत शोध  घेऊन दोघांचा मृतदेह बाहेर काढला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *