Pune News : संकटात धावून आले मित्र! मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज मित्रांनी फेडले
वेळ आणि काळ सतत बदलत राहतात, मात्र, चांगले मित्र कधी बदलत नसतात!!
Pckhabar- भारतीय परंपरेत मैत्रीला कायमच महत्त्व आहे. आयुष्यात पालक व शिक्षकांनंतर मित्रांना स्थान आहे. पण जेव्हा-जेव्हा मैत्रीची चर्चा होते, तेव्हा लोक द्वापारयुगातील कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीचे उदाहरण देण्यास विसरत नाही. 21 व्या शतकात आणि कलियुगातसुद्धा कृष्णासारखे व सुदामासारखे सच्चे मित्र अजून आहेत. त्यामुळेच ही समाजव्यवस्था खऱ्या अर्थाने टिकून आहे. या मैत्रीचे असेच जबरदस्त उदाहरण पुणे जिल्ह्यात समोर आले आहे. मित्राने त्याच्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज इतर मित्रांनी एकत्र येऊन कर्जमुक्त केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळेच वेळ आणि काळ सतत बदलत राहतात, मात्र चांगले मित्र कधी बदलत नसतात, असे म्हणावे वाटते!
दापोली कृषी महाविद्यालयात सन १९९० ते ९४ बी.एस्सी. (कृषी) ची ही बॅच मुळशी तालुक्यातील चाले गावचे रहिवासी आणि श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासारसाई येथे गार्डन सुपरवायजर असलेले राजेश दहिभाते त्यांच्या सायली या मोठ्या मुलीचे लग्न बोतरवाडी, मुळशी, पुणे येथील शेलार या त्यांच्या नात्यातील मुलाबरोबर ठरले. साखरपुडा झाला आणि कडक लॉकडाऊन सुरू झाला. वधू आणि वधूपिता दोघांना कोरोनाची लागण झाली.
बेताची कमाई, लॉकडाऊन आणि स्वतः कोरोनाबाधित त्यामुळे लग्नासाठी दहिभाते यांनी साखर कारखान्याच्या कामगार पतसंस्थेचे दीड लाखाचे कर्ज घेतले. कोरोनाचे सर्व नियम पाळून है लग्न 4 मे 2021 रोजी पार पडले. कडक लाॅकडाऊनमुळे वधूपित्याच्या मित्रांना विवाहला उपस्थित राहता आले नाही. परंतु आपल्या गरीब व साध्या भोळ्या मित्राने मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढले, ही बातमी त्यांच्या मित्रांना समजली. सर्व मित्रांनी आपल्या प्रिय मित्राला ‘कर्जमुक्त’
करण्याचा निर्णय घेत सर्वांनी मिळून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.
राज्याच्या विविध भागात नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या सर्व मित्रांशी मावळमधील कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोहाडे यांनी समन्वय साधला आणि रक्कम गोळा केली. 20 मे 2021 रोजी पतसंस्थेला एकूण बाकी कर्जाच्या रकमेचा धनादेश देऊन आपल्या या प्रिय मित्राला लग्नाच्या कर्जातून मुक्त केले.
या सर्व मित्रांच्या ‘औदार्याची’ मुळशी, मावळ तालुक्यासह संत तुकाराम कारखाना परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
यामध्ये काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बाजीराव खाडे, उपजिल्हाधिकारी प्रकाश संकपाळ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव संजय तवरेज, सांगली येथील संचालक वन प्रशिक्षण केंद्र शैलेश जाधव, म्हाडाचे सहायक संचालक एम. जे. रॉड्रीझ, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बनकर, माजी सरपंच श्री. कुंडलिक खैरे, कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील प्राध्यापक मुरलीधर कांबळे, कोल्हापूर येथील कृषी शास्त्रज्ञ शैलेश कुंभार, कृषी अधिकारी पुणे श्रीधर चिंचकर, कोल्हापूर येथील प्रा. राजकुमार परीट, कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे मॅनेजर श्री. भरत मोळे, सातारा जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी संदीप दीक्षित, ग्रामसेवक नासिर पठाण, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी कन्सल्टंट अक्षय जाधव, राष्ट्रीय काजू महामंडळाचे सदस्य आबासाहेब सावंत, वाई येथील कृषिसेवा केंद्राचे चालक राजेंद्र फरांदे या सर्वांनी आर्थिक मदत केली.










Leave a Reply