Pimpri News : महापालिकेचा घरकुलमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’
Pckhabar- चिखली येथील घरकुल वसाहतीतील अनेक रस्त्याचे डांबरीकरण गेल्या तीन वर्षांपासून रखडले होते. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या रस्त्यांची देखभाल होत नव्हती.
मात्र, सात महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीमुळे अनेक कार्यसम्राट लोकप्रतिनिधी संवेदनशील झालेले आहेत. भरपावसात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डांबरीकरणाचा खेळ सुरू केला आहे. भरपावसात डांबरीकरण केल्याने हे डांबरीकरण किती दिवस राहिल, याबाबत नागरिक शंका उपस्थित करत आहेत.
पावसाळा सुरू होऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात रस्ते खोदाई सुरू आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. पावसाची रिप रिप चालू असताना मोहननगर, चिखली जाधववाडी या भागात डांबरीकरण दिवसा सुरू असल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
मात्र भर पावसात मध्यरात्री मनपाचे ठेकेदार डांबरीकरण करत असल्याचे व्हिडीओ फोटो झळकले आहेत. 26 जूनच्या मध्यरात्री अंधुक उजेडात घरकुल वसाहतीमध्ये डांबरीकरण सुरू होते.
मनपाच्या स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केल्यामुळे आणि कार्यतत्परतेचा ध्यास लागल्यामुळे या मान्सून मध्ये हे डांबर टिकेलं का?अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत.










Leave a Reply