Dehu News : वीजबिल थकले; देहूकरांचा दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद!

Dehu News : वीजबिल थकले; देहूकरांचा दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद!

Pckhabar- 58 लाख रूपये वीजबिल थकल्यामुळे देहूकरांचा दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. अचानक पाणी पुरवठा बंद झाल्याने  नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावरवर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

श्रीक्षेत्र देहूगावच्या पुरवठा योजना, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि पथदिव्यांचे वीजबिलापोटी तब्बल  ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे महावितरणने दुसऱ्यांदा वीजपुरवठा खंडित केला आहे.

महावितरणच्या वतीने पाणीपुरवठा आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने हा पाणीपुरवठा बंद आहे. तर, पथदिव्यांच्या वीज बिलापोटी थकीत असलेल्या सुमारे १७ लाख रुपये थकीत असल्याप्रकरणी नोटीसही बजावण्यात आली आहे.

नगरपंचायतीच्या वतीने दोन लाख रुपये पाणी पुरवठ्याच्या संदर्भात व दोन लाख रुपये मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे बिल असे चार लाख रुपये भरले आहेत. त्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता.

57 लाख 60 हजार रुपयांची थकबाकी!

देहूगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यापासून  प्रशासक म्हणून मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे काम पाहत आहेत. देहूच्या पाणीपुरवठा योजनेची ३२ लाख ३४ हजार, मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे वीजबीलही सुमारे ८ लाख २६ हजार रुपये थकबाकी आहे. यामुळे महावितरण कंपनीने  वीजजोड तोडण्याबाबतचे आदेश शाखा अभियंत्यांना दिले होते. पथ दिव्याची थकबाकी सुमारे १७ लाख रुपये असे एकूण ५७ लाख ६० हजार रुपये थकबाकी आहेत.

दरम्यान, देहूगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होऊन सहा महिने झाले. कोरोनामुळे निवडणूक होऊ शकत नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासकाची नियुक्ती केली. मात्र, नगरपंचायतकडे निधीच नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, पाणी पुरवठा, मैला शुध्दीकरण प्रकल्पाचे वीज बिल भरणे प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *