Dehu News : देहू नगरपंचायतीची प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया सुरू करा
जनजागृती सामाजिक मंचाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
Pckhabar- कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतीची प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया सुरू करण्याची मागणी जनजागृती सामाजिक मंचाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
याबाबत जनजागृती सामाजिक मंचाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाला निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, देहू ग्रामपंचायतीची मुदत दि.२२ ऑगस्ट २०२० रोजी संपली आहे. शासनाने ग्रामपंचायतीचे कामकाज पाहण्यासाठी हवेलीचे विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी संबंधित अधिकारी यांनी ग्रामपंचायत वार्ड रचना व आरक्षण प्रक्रिया पार पाडली होती. परंतु कोरोना महामारीमुळे सदरच्या निवडणूका होवू शकल्या नाही. त्यानंतर महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने दि.८ डिसेंबर २०२० ला देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर केल्याची घोषणा केली. नव्याने रचना केलेल्या देहू नगरपंचायतीची रितसर रचना होईपर्यंत उक्त नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकारी यांची नियुक्ती करणे आवश्यक होते.
त्यासाठी नगरविकास विभागाने प्रशासक म्हणून मावळचे तहसिलदार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. देहू ग्रामपंचायतीची मुदत दि.२२ ऑगस्ट २०२० रोजी संपली. ते पाच महिने व नगरपंचायत होवून जवळपास सात महिने होत आले असून प्रशासक कामकाज पाहत आहेत. त्यामुळे मा.प्रशासक यांना लोकप्रतिनिधी नसल्याने विकासात्मक तसेच इतर कामकाज करताना खर्च करण्याच्या मर्यादा असल्याने आर्थिक दृष्ट्या अडचणी येत आहेत.
कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विलंब होत असल्याने तसेच उमेदवार यांना प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदारांपर्यंत पोहचता येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर केव्हाही निवडणूक होऊ शकते. त्यामुळे देहू नगरपंचायत प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी जनजागृती सामाजिक मंचाचे अध्यक्ष प्रकाश काळोखे, सचिव दिलीप गोसावी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.










Leave a Reply