Maval News : विद्यार्थ्यांसाठी धावले आजी- माजी आमदार; 35 टक्के शैक्षणिक फी मध्ये मिळणार सवलत
मावळच्या शैक्षणिक फी सवलतीच्या पॅटर्नची जोरदार चर्चा
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मावळातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पुढाकारामुळे मावळ तालुक्यातील शैक्षणिक संस्थांनी 30 टक्के तर आमदार शेळके यांच्या वतीने 5 टक्के अशी विद्यार्थ्यांना 35 टक्के शैक्षणिक फी मध्ये सवलत देण्याचा आज (सोमवार) निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा 14 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री मंत्री बाळा भेगडे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी राक्षे, तालुक्यातील विविध इंग्रजी माध्यमाच्या संस्थांचे प्रतिनिधी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोनामुळे शैक्षणिक संस्था बंद असून गेल्या दिड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावला होता. मात्र, आर्थिक संकटामुळे फी मध्ये सवलत द्यावी, अशी मागणी अनेक पालकांनी केली होती.
आमदार शेळके आणि माजी मंत्री भेगडे यांच्या पुढाकारामुळे संस्था चालकांनी पालकांना तीस टक्के सवलत देण्यास सहमती दर्शवली. तर आमदार शेळके यांनी 5 टक्के स्व खर्चातून अशी एकूण 35 टक्के सवलत पालकांना देण्याचा निर्णय झाला आहे.










Leave a Reply