Article Dr. Ankush jadhav : पाण्याविषयी थोडेसे…

Article Dr. Ankush jadhav : पाण्याविषयी थोडेसे…
वाचा डॉ. अंकुश जाधव यांचा माहितीपूर्ण लेख
Pckhabar-पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच आपण करू शकत नाही. पाण्याला “जीवन”असे दुसरे नाव असून ते सार्थ ही आहे. मानवी शरीरात ७०टक्के पाणीच असते. सामान्यतः एक पुरुष व्यक्ती दररोज तीन लिटर तर स्त्री २.२ लिटर पाणी पिते. अर्थात पाणी पिण्याची हे प्रमाण व्यक्ती ज्या प्रदेशात रहाते तो प्रदेश, तेथील हवामान, त्याचे वय, तो काय काम करतो इ. गोष्टींवर अवलंबून असते. सामान्यतः ३० टक्के पाणी खाद्य पदार्थातून, ८ टक्के पाणी शरीरातील पचन क्रियेतच तयार होते तर बाकीचे प्यालेले पाणी व इतर पेयांद्वारे शरीरात घेतले जाते.

पाण्यामुळे शरीरातील पचन व शोषणाची क्रिया होते. रक्त पातळ राहते. शरीरात निर्माण होणारे विषारी पदार्थ शरीराबाहेर काढण्यास मदत होते इ. अनेक कार्ये पाण्यामुळे होतात.

“भरपूर पाणी प्या ,शरीर,
किडन्या स्वच्छ ठेवा” वा मुतखडा झाला असेल तर मुद्दाम अधिक पाणी प्याले जाते. परंतु हे तितकेसे बरोबर नाही. कारण आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी प्याल्यास मूत्रपिंडावर अनावश्यक दाब पडून मूत्रपिंड या अवयवासह शरीरात अनेक प्रकारचे आजार होतात, जे पुढे बरे होणे कठीण जाते. एक साधा नियम आहे जेवढे पाणी घेतले जाते तितकेच पाणी शरीराबाहेर जाणे आवश्यक असते.

शरीरातून ३५ टक्के पाणी त्वचेद्वारे, २० टक्के श्वसन मार्गाद्वारे, ३ टक्के मल व थुंकी वाटे तर ४० टक्के पाणी मूत्रावाटे शरीराबाहेर फेकले जाते.

बरेच लोक विचारात पाणी केव्हा व किती प्यावे? याच साधं उत्तर आहे, शरीर जेव्हा पाण्याची मागणी करते तेव्हा व इच्छा पूर्ण होईल इतके पाणी प्यावे. केव्हा ही इच्छा नसताना पाणी पिऊ नये. उन्हाळ्यात पाणी जास्त प्याले जाते तर पावसाळा व हिवाळ्यात कमी प्याले जाते. जेवताना सुद्धा आवश्यक तेवढेच पाणी प्यावे.

साधारण थंड पाणी-पित्त दोष, विष, भ्रम, दाह, अजीर्ण, श्रम नाशक असते. उष्ण-कोमट-पाणी- कफदोष,
मेद, वातदोष, आमपाचक, कोष्ठशुद्धीकर, श्वास-कास-ज्वर नाशक असून हे नेहमीच पिण्यास हितकर असते. ज्यांची भूक कमी आहे त्यांनी जेवणापूर्वी एक तासभर तरी पाणी पिऊ नये.

ज्यांना आपलीं जाडी कमी करायची आहे त्यांनी जेवणापूर्वी पाणी प्यावे व ज्यांना जाड व्हायचे आहे त्यांनी जेवणानंतर पाणी प्यावे. जेवताना मधे मधे थोडे पाणी प्यावे. जेवणानंतर तासाभराने जास्त पाणी प्यावे.

ज्यांना नेहमी सर्दी, दमा, खोकला इ.श्वसन संस्थेचे आजार असतील त्यांनी रात्री झोपताना पाणी पिऊ नये.

ज्यांचे पोट साफ होत नसेल त्यांनी शौचास जाण्यापूर्वी वातावरणानुसार थंड वा कोमट पाणी ग्लासभर प्यावे.

ज्यांना छाती, घसा, पोट यांचे तसेंच उचकी, ताप असे आजार असलेल्यांनी नेहमीच कोमट पाणी प्यावे.

काही लोक जाडी कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध घालून पितात. मध गरम पदार्थाबरोबर कधी खाऊ वा पिऊ नये.

अति थंड वा अति गरम पाणी न पिता साधारण पाणी प्यावे. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी,आहे ते कायम राहण्यासाठी या प्रमाणे पाण्याचा उपयोग करा.

डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *