Lonavala News : भरकटलेल्या गव्याला राजमाची जंगलात घालवण्यात वनविभागाला यश

Lonavala News : भरकटलेल्या गव्याला राजमाची जंगलात घालवण्यात वनविभागाला यश

Pckhabar : मावळ तालुक्यातील पाटण , मळवली व भाजे गाव आणि त्यानंतर लोणावळा शहर परिसरात रानगव्याचे नागरिकांना दर्शन झाले . डोंगर भागातून भरकटलेला एक रानगवा मागील दोन दिवसापासून लोणावळा शहर व ग्रामीण भागात फिरत असलेला नागरिकांना आढळून आला होता .

मावळ तालुक्यातील राजमाची किल्ला परिसराचा भाग हा भिमाशंकर अभय अरण्यात येतो तर मळवली , पाटण , लोहगड भागातील डोंगर भाग इको सेन्सेटिव्ह भाग म्हणून घोषित झाला असल्याने या भागात जंगल वाढत आहे . या परिसरात सहा सात गव्यांचा एक थवा असल्याचे या भागातील नागरिक सांगतात . दोन दिवसापुर्वीच लोहगड व विसापूर किल्ल्यांच्या पायथ्याशी डोंगर भागात वसलेल्या पाटण गावात रविवारी एक रानगवा नागरिकांना दिसला . नागरिकांनी त्याला डोंगर भागात पाठवून दिले मात्र लाईटच्या उजेडावर तो पुन्हा मळवली भागात आला येथून तो भाजे गाव परिसरात गेला . सोमवारी सकाळी हा गवा लोणावळा धरणात दिसून आला . पूर्ण वाढ झालेला हा गवा सोमवारी सायंकाळी लोणावळा शहरातील मावळा पुतळा चौकात दिसला तेथून तो गवळीवाडा नाका, इंदिरा नगर, डॉन बॉस्को हायस्कूल, तुंगार्ली परिसरात वावरताना आढळला.

दरम्यान रानगवा शहरी भागातील मानवी वस्तीत फिरत असल्याची बातमी वनविभागाला समजताच दखल घेत वनविभागाचे लोणावळा वनपाल सागर चुटके , कार्ला वनपाल प्रमोद रासकर , संदीप रामगुडे , वनरक्षक मयुरी धायगुडे , वनरक्षक आनंद भालेकर , वीरेंद्र लंकेश्वर , संदीप आंबेकर, शिवदुर्ग रेस्कू टिमचे सुनील गायकवाड व टीम शिवदुर्ग मित्र , पोलीस प्रशासन शहर यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सदर रानगवा तुंगार्ली धरण मार्गे सोमवारी रात्री राजमाचीच्या जंगल भागात सुखरूप घालविला . सर्वांनी प्रयत्न केल्याने वन्यजीवाचा प्राण वाचला आहे . कळपामधून भरकटलेला गवा हा भितीपोटी वाट सापडेल त्या दिशेने जात होता . सुदैवाने या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *