Pimpri Crime News: काँग्रेस पर्यावरण विभागाच्या माजी प्रदेशाध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा
काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षांची केली 32 लाखांची फसवणूक
Pckhabar- काँग्रेस पर्यावरण विभागाच्या माजी प्रदेशाध्यक्षाने काँग्रेसच्याच माजी महिला प्रदेशाध्यक्षांची 32 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 एप्रिल 2009 ते 14 ऑक्टोबर 2010 या कालावधीत प्राधिकरण पुणे येथे घडला. याबाबत 7 जून 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेस पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक गणपत मोरे (वय 52), आणिं त्यांच्या पत्नी अस्मिता अशोक मोरे (वय 47, दोघे रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा श्यामला मच्छिंद्र सोनवणे (वय-62, रा. प्राधिकरण पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक मोरे हे काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष असून फिर्यादी सोनवणे या काँग्रेसच्याच माजी महिला प्रदेशाध्यक्षा आहेत.
सोनवणे यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. फिर्यादी आणि आरोपी यांची 20 वर्षांपासून ओळख आहे. त्यामुळे आरोपी अशोक यांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी अजमेरा पिंपरी येथील एका घराचे फेब्रिकेशनचे काम केले. तसेच आरोपी यांच्या एम्पायर इस्टेट चिंचवड येथील घराचे आणि अस्मिता इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील फॅब्रिकेशनचे काम देखील फिर्यादी यांनी केले.
या कामाचे 11 लाख रुपये इतके बिल झाले होते. आरोपींची अस्मिता इंजीनियरिंग कंपनी आर्थिक अडचणीत असल्याने, कंपनीवर जप्ती आल्याने फिर्यादी यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर साक्षीदारासह 12 लाख रुपयांची रक्कम आरोपी यांना दिली होती.
तसेच फिर्यादी यांच्या पतीने नऊ लाख रुपयांची रक्कम आरोपींना दिली. या बदल्यात आरोपींनी फिर्यादी यांना चार धनादेश दिले होते. ते धनादेश बँकेत भरल्यानंतर बाऊंस झाले. आरोपींचे बँकेतील खाते आधीच बंद झालेले असताना त्या बँकेचे धनादेश आरोपीने फिर्यादी यांना दिले. या संपूर्ण प्रकारात आरोपींनी फिर्यादी यांची 32 लाख रुपयांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.









Leave a Reply