Maval News : मावळच्या जनतेने दिड वर्षांपूर्वीच सचिन वाझेला घरी बसविले  : आमदार सुनिल शेळके यांचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना प्रतिउत्तर

Maval News : मावळच्या जनतेने दिड वर्षांपूर्वीच सचिन वाझेला घरी बसविले  : आमदार सुनिल शेळके यांचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना प्रतिउत्तर
Pckhabar- भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद आणि मावळ पंचायत समितीमध्ये प्रचंड भ्रष्ट कारभार सुरू आहे. येथे लक्ष देण्याऐवजी माझ्यावर बेछूट आरोप केले जात आहे. मात्र, तुमचे एजंट कोण होते, हे मागच्या दहा वर्षांत मावळच्या जनतेने पाहिले आहे.  जनतेने दीड वर्षांपूर्वीच सचिन वाझेला ओळखले होते. त्यामुळेच या सचिन वाझेला घरी बसविले आहे, असे रोखठोक प्रतिउत्तर मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे नाव न घेता दिले.

वडगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार शेळके बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, तळेगाव नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेविका मंगल भेगडे, संगीता शेळके, नगरसेवक अरूण माने आदी  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात गेल्या दीड वर्षात लाचलुचपत  विभागाने आठ शासकीय लाचखोर अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडून कारवाई केली. या अधिकार्‍यांना महाविकास आघाडी सरकारने वसुलीचे टार्गेट दिल्यामुळे हे अधिकारी वसुली करत असल्याचा गंभीर आरोप, माजी राज्यमंत्री, भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता.
तसेच प्रशासनावर कोणाचाच अंकुश नसल्याने काही अधिकारी संगनमताने आर्थिक उलाढाली करीत असल्याचाही सनसनाटी आरोपही भेगडे यांनी केला होता.

या आरोपांना मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भेगडे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

आमदार शेळके म्हणाले”  मागील दहा वर्षांत यांचे कोण एजंट होते हे आम्हाला माहिती नाही काय? बदल्यात कसे पैसे कमावले याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे.  मावळ तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी विकास कामे न करता केवळ प्रसिद्धीसाठी महाविकास आघाडीवर खोटे आरोप करत आहेत. जनतेची दिशाभूल करत आहेत”.

तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद आणि मावळ पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. या तिन्ही ठिकाणी प्रचंड भ्रष्ट कारभार सुरू आहे.

तळेगाव आणि लोणावळा नगरपरिषदेतील भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शांत बसणार नाहीत, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला.

दरम्यान, मावळमध्ये सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *