Pune District News : नोकरीच्या मागे न लागता इंजिनिअर आदित्य रमला शेतीत
कोथिंबीरचे घेतले भरघोस उत्पन्न

Pckhabar-इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण झालेले अनेक जण मोठ-मोठ्या कंपन्यात नोकरी करण्याचे स्वप्न बघतात. मात्र, देहूगाव येथे स्थायिक झालेल्या दिपक निगडे यांचे पुत्र आदित्य याने शिक्षण पुर्ण केल्यानंतर आयटीतील गल्लेलट्ट पगाराच्या नोकरीच्या मागे न लागता गावचा रस्ता धरला. पारंपरिक शेतीला फाटा देत आदित्य याने तुषार सिंचनाचा वापर करून सव्वा एकरमध्ये कोथिंबीरचे भरघोस पिक घेतले. अवघ्या 22 हजारांच्या खर्च करून 1 लाख 10 हजार रूपयांची कोथिंबीरची शेतातच व्रिकी झाली.
कोरोना महामारीमुळे अनेक आयटीमधील
इंजिनिअर तरूणाच्या नोकर्या गेल्या आहेत. ज्यांच्या नोकर्या आहेत, त्यांना तासन् तास कॅम्प्युटरवर बसून काम करावे लागत आहे. त्यानंतरही अनेक जण चांगल्या आणि नामांकित कंपनीतील नोकरीला प्राध्यान्य देतात. मात्र, देहूगाव येथे स्थायिक असलेले दिपक निगडे यांचे पुत्र आदित्य याने इंजिनिअरिंग पुर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपले गाव कर्नलवाडी (ता. पुरंदर) चा रस्ता धरला. पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी कमीत-कमी पाण्यात जमेल ती शेती करतात. मात्र, आदित्य याने आजोबा भगवान निगडे यांच्या पारंपारिक शेतीला फाटा देत नाविन्यपूर्ण आणि आधुनिक शेती करण्याचा मानस केला.
कोणत्याही पिकाला पाटाने पाणी दिले तर पाणी जास्त लागते. त्यामुळे आदित्य याने तुषार सिंचनाच्या माध्यमातून सव्वा एकरमध्ये कोथिंबीरचे पीक घेतले. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली आदित्यने चांगली मेहनत घेतली अन् बघता-बघता कोथिंबीरचे पिक जोमात आले. परिसरातील अनेक शेतकर्यांनी कोथिंबीरचे पीक घेतले. मात्र, आदित्यने अवघ्या सवा एकरमध्ये 22 हजारांचा खर्च करून सर्वाधिक कोथिंबीरचे पीक घेऊन 1 लाख 10 हजार रूपयांचे उत्पन्न मिळविले. या कोथिंबीरची विक्री शेतातच झाल्याने बाजारपेठेत घेऊन जाण्याची आदित्यला गरज भासली नाही.
याबाबत pckhabar शी बोलताना आदित्य म्हणाला की, ”लहानपणापासूनच मला शेतीची आवड आहे. त्यात गावाकडे आजोबांची वडिलोपार्जित शेती आहे. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा खूप मोठा प्रश्न डोळ्या समोर होता. Corona कालावधीमध्ये हा प्रश्न आणखीनच वाढला. त्यामुळे गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये माझ्या घरच्यांनी देखील मला साथ दिली आणि गावाकडे गेलो. तिथे गेल्यानंतर आजोबांच्या पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले”.










Leave a Reply