Pimpri news: ‘ऑटो क्लस्टरमधील सेवा अधिग्रहित केलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिका रुग्णालयात घ्या’
भाजप नगरसेवक विकास डोळस, कुंदन गायकवाड, सागर हिंगणे यांची आयुक्तांकडे मागणी
Pckhabar- रुग्णसंख्येअभावी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय कालपासून बंद करण्यात आले असून स्पर्श या खासगी संस्थेच्या सेवा अधिग्रहित केलेल्या कर्मचा-यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांचा रोजगार गेला आहे. वैद्यकीय मनुष्यबळाची भविष्यात गरज लागणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मानधनावर महापालिका रुग्णालयात घ्यावे. किंवा एक महिन्याची नोटीस देऊन कार्यमुक्त करावे, अशी मागणी ‘इ’ प्रभागाचे अध्यक्ष विकास डोळस, ‘फ’ प्रभागाचे अध्यक्ष कुंदन गायकवाड, स्वीकृत सदस्य सागर हिंगणे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सर्व सोयींनी सुसज्ज अशी यंत्रणा ऑटो क्लस्टरमध्ये उभारलेली आहे. सद्यपरिस्थीमध्ये ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयामध्ये एकही रुग्ण नाही. त्यामुळे रुग्णसंख्येअभावी ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालय बंद करण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी फॉर्च्युन स्पर्श या खासगी संस्थेचे 9 मे रोजी अधिग्रहित करण्यात आलेले सर्व कर्मचा-यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.
अचानक कार्यमुक्त केल्याने हे कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. नगरसेवक विकास डोळस, कुंदन गायकवाड, सागर हिंगणे यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांची मागणी समजून घेतली. त्यानंतर या नगरसेवकांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात रुग्णांची चांगली सेवा केली आहे. गरज संपली म्हणून त्यांना अचानक बेरोजगार करणे चुकीचे आहे. भविष्यात वैद्यकीय मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना महापालिका रुग्णालयात मानधनावर घ्यावे. किंवा एक महिन्याची नोटीस देऊन त्यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली. याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे या नगरसेवकांनी सांगितले.







Leave a Reply