Talegaon News : खळबळजनक! नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांच्यासह दोघांवर 9 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Talegaon News : खळबळजनक!
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांच्यासह दोघांवर 9 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Pckhabar-  बिलाची रक्कम काढण्यासाठी 9 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये नव्याने नियुक्त झालेले मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी आणि उद्यान पर्यवेक्षक विशाल मिंड यांच्यावर आज सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोशेट्टी यांना पोलिसांनी अटक केली आहे तर मिंड फरार झाले आहेत.

 मुख्याधिकारी श्याम लक्ष्मणराव पोशेट्टी (वय-44, रा. तळेगाव दाभाडे), विशाल अंकुश मिंड (वय-33, रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर लाच प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ठेकेदाराने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी  ‘मे आय सिक्युअर पावर टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणे कंपनीच्या प्रलंबित चार बिलाची रक्कम काढण्यासाठी नऊ लाख रुपयांची मिंड यांनी लाच मागितली. तर लाच घेण्यासाठी पोशेट्टी यांची सहमती होती. संबंधित ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाला याबाबत माहिती दिली. याची खातरजमा करून लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून आज (सोमवारी) त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, फेब्रुवारी 2021 पासून रिक्त असलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी पदावर श्याम पोशेट्टी यांची महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने  3 मे रोजी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 4 मे रोजीच मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता. पोशेट्टी यांना अवघ्या 28 दिवसात लाच घेताना  पकडल्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *