Bhosari Crime News: आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल

Bhosari Crime News: आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल
Pckhabar- कोरोना महामारी असतानाही मुलीच्या मांडव डहाळे कार्यक्रमाचे आयोजन करून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या बंधूसह 60 जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ यादरम्यान आमदार लांडगे यांच्या घरासमोर लांडगे आळी, भोसरी गावठाण येथे घडला.

आमदार महेश किसनराव लांडगे, सचिन किसनराव लांडगे, अजित सस्ते, कुंदन गायकवाड, राहूल लांडगे, दत्ता गव्हाणे, गोपी कृष्ण धावडे, सुनिल लांडे, नितिन गोडसे, प्रज्योत फुगे यांच्यासह आणखी 60 जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात करोना नियमांची पायमल्ली केल्यामुळे 188, 269, 34 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जमावबंदीचे उल्लंघण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुरेश नानासो वाघमोडे (वय-32) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी हिचे लग्न आहे. या लग्नानिमित्त रविवारी सायंकाळी मांडव डहाळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले. कोरोना आपत्तीत कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे 40 ते 50 लोकांची गर्दी करत नाचगाणे करून वाद्य वाजवली.

या कार्यक्रमामध्ये अनेकांनी मास्कही घातला नव्हता. तसेच जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *