Pimpri news: वल्लभनगर आगारातून महिनाभरात लालपरीची एकही फेरी नाही
1 कोटी 80 लाखांचे उत्पन्न बुडाले
Pckhabar- कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात संचारबंदी आणि कडक निर्बंध लावण्यात आले. यामुळे केवळ अत्यावश्यक कारण असलेल्या नागरिकांना व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, प्रवासीच नसल्याने पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एसटी आगारातून गेल्या महिनाभरात एसटीची एकही बस फेरी झाली नाही. यामुळे वल्लभनगर आगाराचे 1 कोटी 80 लाखांचे उत्पन्न बुडाले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना एसटी मार्फत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडायला तयार नाहीत. अत्यावश्यक कारणासाठी गरज पडल्यास नागरिक खासगी वाहनांचा उपयोग करत आहेत. यामुळे एसटीला प्रवासीच मिळत नाहीत. वल्लभनगर आगारातून 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन लागू केल्यापासून एकही प्रवासी बसफेरी झाली नाही.
एसटीला संचलन करण्यासाठी किमान पंधरा प्रवाशांची तरी, आवश्यकता असते. मात्र, एकाच मार्गावरील पंधरा प्रवासी मिळणे लॉकडाऊनच्या काळामध्ये अवघड झाल्याने एकाही मार्गावर बस संचलन करता येत नाही. कमी प्रवाशावर संचलन केल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड एसटी महामंडळाला बसतो. वल्लभनगर आगारातून सामान्य परिस्थितीत सुमारे 42 बसफेऱ्या होतात. दैनदिन महसूल सहा लाखांच्या घरात असतो. मात्र, प्रवासीच नसल्याने मोठा आर्थिक भुर्दंड एसटी महामंडळाला सहन करावा लागत असून महिनाभरात एक कोटी ऐंशी लाखांचा महसुल बुडाला आहे. आगारात दररोज चौकशीसाठी सुमारे दीडशे चौकशीचे कॉल येतात. मात्र, एका मार्गावरील प्रवासी नसल्याने बस सोडण्यास अडचणी येत आहेत. आधीच्या लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. यामध्ये आता परत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुसरा लॉकडाऊन जाहीर केल्याने एसटी महामंडळाची अवस्था दयनीय झाली आहे.
महिनाभरापासून जुन्नरला टपाल वाहतूक करणारी बस सोडली तर, एकही प्रवासी बस वल्लभनगर आगारातून सोडली गेली नसल्याची माहिती स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी दिली आहे.










Leave a Reply