Pimpri news: भाजप नगरसेवकाच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्र्यांवर आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ – विलास लांडे

Pimpri news: भाजप नगरसेवकाच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्र्यांवर आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ – विलास लांडे
Pckhabar-पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेची परस्पर विक्री केल्यावरुन भाजपचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात येत असलेले आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत, अशी  प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे. प्रशासकीय कारवाईला राजकीय रंग देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपचे काही नेते करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपच्या शहराध्यक्षांचे समर्थक नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विकून 15 लाख 80 हजार रुपये हडप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यानंतर आवश्यक त्या पुराव्यांसह पोलिसांकडे फिर्याद नोंदविली आहे. ही पूर्णपणे प्रशासकीय पातळीवरची कारवाई आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने कान भरल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून ही कारवाई केल्याचा अपप्रचार भाजपचे काही नेते करीत आहेत. हा प्रकार म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकाच्या बेकायदा कामांना पाठीशी घालण्याचा केविलवाला प्रयत्नच म्हणावे लागेल, असे लांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून त्यातून जनतेसमोर सत्य येणारच आहे. संबंधित नगरसेवकाने कोणताही गुन्हा केला नसेल तर ते पोलीस चौकशीत निष्पन्न होईलच. मग भाजपचे नेते चौकशीला सामोरे जाण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात कांगावा का करीत आहेत, असा सवाल लांडे यांनी केला आहे.

महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी अशा शासकीय व निमशासकीय संस्थांच्या जागा बळकावून त्यावर स्वतःचा उदरनिर्वाह चालविण्याचा धंदा भाजपच्या आशीर्वादाने काही मंडळींनी बनविला आहे. या कारवाईच्या माध्यमातून त्यांचे बेकायदेशीर उद्योग चव्हाट्यावर आल्याने ते चवताळले आहेत, असा गंभीर आरोप लांडे यांनी केला आहे.

पाण्याच्या टाकीच्या जागेचा विषय हा निव्वळ लोकांची दिशाभूल करून सहानुभूती मिळविण्यासाठी पुढे करण्यात आला आहे. संबंधित जागा सोसायटीची असुन महापालिकेच्या ताब्यात नसतानाही त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्याचा घाट घातला जात आहे. भाजपचे दिवंगत नेते अंकुश लांडगे यांची त्या जागेवर मंदिर उभारण्याची इच्छा होती. त्यानुसार उभारण्यात आलेल्या मंदिराचे भूमिपूजनही अंकुशराव लांडगे यांच्या हस्ते झाले होते. त्याचा विसर भाजपच्या नेत्यांना पडला आहे का, असा प्रतिसवाल लांडे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कधीच विकासकामांच्या आड आलेली नाही, किंबहुना पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवारांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच झाला आहे. भाजपच्या कांगाव्याला बळी पडण्याइतकी जनता नक्कीच दुधखुळी नाही, असेही लांडे यांनी म्हटले आहे.