Dehuroad News: वाहतूक कोंडीतून होणार सुटका; लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनमध्येही जोरात

Dehuroad News: वाहतूक कोंडीतून होणार सुटका; लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनमध्येही जोरात
Pckhabar- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले काम लाॅकडाऊनमध्येही वेगात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून वाहन चालकांची कोंडीतून सुटका होणार आहे. तसेच पेट्रोल आणि नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.

देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने काम बंद करण्यात आले होते. दरम्यान, वर्षभर उड्डाणपुलाच्या कामाला रेल्वे विभागाकडून अंतिम मान्यता मिळाली नव्हती. लोहमार्ग उड्डाणपुलाचे कामांसह रखडलेल्या विविध कामांबाबत कॅन्टोन्मेंटच्या सभागृहात २३ आॅक्टोबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी आढावा घेतला होता. या वेळी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता रा. रा. सोनवणे, उपअभियंता नवदीप परमार उपस्थित होते. त्यानंतर अधिका-यांनी दिलेल्या मुदतीत पुलाचे काम सुरू न केल्याने आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्यावतीने महामार्गावर आंदोलन करण्यात आले होते. अखेर रेल्वेच्या संबंधित विभागाकडून उड्डाणपुलाच्या कामासाठी मान्यता मिळाल्यानंतर त्या महिन्यात ७ एप्रिलला पहिला ब्लॉक मिळाला होता. १५ एप्रिलपासून राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, नियमावलीचे पालन करीत लोहमार्गावर टाकण्यात आलेल्या सांगाड्यावर सळ्यांची जाळी विणण्याचे कामे वेगात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

असा साकारतोय उड्डाणपूल

लोहमार्गावरील उड्डाण पुलाची एकूण लांबी : ५० मीटर

उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी : १२.५ मीटर

याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे म्हणाले, “पुलाचे काम वेगात सुरू आहे. स्लॅब कास्टिंगचे काम झाले आहे. ‘अप्रोचे’सचे काम बाकी आहे. 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात अडचण येत आहे. कामगार मध्येच जातात. फॅब्रिकेशनच्या कामासाठी, कटिंगसाठी ऑक्सिजन मिळत नव्हता. त्याचा कामावर परिणाम झाला आहे. रेल्वेची परवानगी, लॉकडाऊनमुळे विलंब झाला. 30 जून 2021 च्या आतमध्ये काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *