Editorial :  प्राधिकरणाच्या कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीवर भाजपचाच डोळा?

Editorial :  प्राधिकरणाच्या कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीवर भाजपचाच डोळा?


Pckhabar- पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या  सुमारे १ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी आणि कोट्यवधी रुपयांचे मोकळे भूखंड आहेत. या संपत्तीवर डोळा असल्याचा आरोप शहर भाजपमधील पदाधिकाऱ्यांसह दोन्ही आमदारांनी महाविकास आघाडीवर केला होता. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरणासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एक होण्याचे आवाहन केले होते. मात्र, भाजपचे नगरसेवक आणि आमदारांचे कट्टर समर्थक राजेंद्र लांडगे यांनी प्राधिकरणाची जागा  विकून 15 लाख 80 हजार रूपये उकळले. याप्रकरणी नगरसेवक लांडगे याच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे.  या घटनेमुळे शहर भाजप आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली जात असून या संपत्तीवर भाजपचाच डोळा होता की काय ? अशी चर्चा रंगली आहे.

नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे,  मनोज महेंद्र शर्मा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रविकांत सुरेंद्र ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इंद्रायणीनगर येथील जागा सर्हे नं. 22 मधील 936 चौ. फुट जागा शर्मा आणि ठाकूरला 15 लाख 80 हजार रूपयांना विकल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील भूमिपुत्रांनी जमिनी दिल्यामुळेच प्राधिकरण स्थापन झाले आणि वाढले. शेतकऱ्यांच्या  साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न अद्यापही मिटला नाही. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए)
विलीन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शहरातील भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह आदी नेत्यांनी कडाडून विरोध केला. काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली होती. तर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल यांनी विलीनीकरणाचे समर्थन केले होते.

पुणे शहराच्या हद्दीबाहेर पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असताना कामगारांना कारखान्याजवळ निवासाची सोय व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यामुळे पुणे महानगर प्रादेशिक योजनांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 113 (2) अन्वये 14 मार्च 1972 रोजी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. गोरगरिबांना, कामगारांना अल्प दरात घरे मिळावीत, सुनियोजित वसाहत निर्माण व्हावी या हेतूने स्थापन झालेले  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पन्नास वर्षानंतर अखेर विसर्जित झाले.

नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन करणे, संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबद्ध आणि सर्वांगिण विकास करणे, विकसित झालेले भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक, वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करून देणे असा उद्देश निश्चित करण्यात आला. मात्र, गेल्या काही वर्षांत बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे नवीन गृहप्रकल्प निर्माण झाले नाहीत.

कामगार कष्टकरी वर्गासाठी स्थापन झालेल्या नवनगर विकास प्राधिकरणाचा उद्देश सफल झाला नाही. त्यामुळे नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करून पिंपरी – चिंचवड महापालिकेत समाविष्ट करावे, अशी मागणी वर्षांनुवर्षे केली जात होती. डिसेंबर 2020 मध्ये प्राधिकरण विसर्जित करण्याची चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत झाली होती. प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्यात आले आहे.

आता प्राधिकरण विलीन झाल्यावर शहरातील संपत्ती, ठेवी पीएमआरडीएकडे वर्ग होणार असून सरकारचा या संपत्तीवर डोळा असल्याचा आरोप भाजपच्या मंडळींनी केला. मात्र, असा आरोप करणाऱ्या भाजपच्याच नगरसेवकाने प्राधिकरणाची जागा विकून पैसे उकळल्याचे उघडकीस आल्याने भाजप नेत्यांचाच प्राधिकरणाच्या संपत्तीवर डोळा होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच जागा विकून महापालिकेत मिळकत कशी काय नोंद केली हाही मोठा प्रश्न आहे. तसेच महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांनी गेल्या साडेचार वर्षात अशा काही शासकीय जागा विकल्या आहेत का? बनावट कागदपत्रांच्या आधारे  पालिकेत याच्या नोंदणी केल्या आहेत का? याची चौकशी होणेही गरजेचे आहे.

तसेच प्राधिकरण वाचविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांना साद घातली होती. मात्र, त्यांच्या कट्टर समर्थक नगरसेवकाने प्राधिकरणाची जागा विकण्याचा पराक्रम केल्याने आमदार लांडगे यांच्या आवाहनाला स्थानिक नेते मंडळी ‘साथ’ देतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

–          संपादक
Pckhabar. Com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *