Pimpri Crime news: … अन् पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा पारा चढला !
आमदार पुत्रासह चौघांना रत्नागिरीतून अटक
Pckhabar- आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रकरणावर खरच गोळीबार झाला आहे का? तुमच्यावर दबाव आहे का? असे प्रश्न विचारल्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश संतापून म्हणाले, गोळीबार झाला आहे. दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोळ्या का झाडल्यात याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात माझ्यावर दबाव असल्याची चर्चा निरर्थक आहे. मी आहे तोपर्यंत दबावाखाली येणार नाही. कोणत्याही आरोपीला सोडणार नाही, हे शंभर टक्के खरे आहे. देर होईल परंतू, दुरूस्त होणार, असा ठाम विश्वास आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना दिला.
पोलिसांना गुंगारा देणार्या आमदार पुत्रासह चौघांना रत्नागिरीतून अटक
कचरा संकलन करणार्या कंपनीच्या सुपरवायझरचे अपहरण करून लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बेल्ट, चॅपरने जबरदस्त मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलासह चार जणांना निगडी पोलिसांनी गुरूवारी रत्नागिरीतील कोळंबे येथून अटक केली आहे. गेल्या 13-14 दिवसांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते.
सिद्धार्थ अण्णा बनसोडे (वय-21, रा. पिंपरी), आमदारांचा स्वीय सहाय्यक सावंतकुमार रमेश सल्लादल्लू (वय-48, रा. लिंक रोड), सतिश दशरथ लांडगे (वय-40, रा. कासारवाडी), रोहित पंद्री (वय-25, रा. चिंचवड स्टेशन), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर यापुर्वी अतिश महादेव जगताप, रोहित ऊर्फ सोन्या गोरख भोसले, सुलतान इम्तीयाज कुरेशी, ऋतिक लक्ष्मण वाघमारे, शुभम आळसंदे, मोहित ऊर्फ एमडी संजय धिवार, अनमोल गुंजेकर, साजीद मेहबुब शेख, रोहित कुसाळकर यांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत 13 आरोपींना अटक केली असून उर्वरित पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अॅन्थोनी कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय- 39, रा. मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सिद्धार्थ अण्णा बनसोडे याच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी हे आमदार बनसोडे यांच्या पीएला उलटे बोलल्याचे समजून आकुर्डी येथील हेडगेवार भवन शेजारी असलेल्या कार्यालयातून पवार यांचे आमदार बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केले. आमदार बनसोडे यांच्या मुलासह सावंत कुमार, लांडगे, साजिद, सुलतान यांच्यासह 15-18 जणांवर पवार यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके, बेल्ट, चॅपरने जबरदस्त मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी आणि दुसरा निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या विरोधात आमदार बनसोडे यांचा कार्यकर्ता सावंतकुमार रमेश सल्लादलू (वय-48, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अॅन्थोनी कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय- 39, रा. मोशी), संकेत शशिकांत जगताप, श्रीनिवास बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार याने आमदारांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
आमदार बनसोडे यांच्या मुलाला पोलीस अटक करत नाहीत, यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली होती. तसेच त्यांच्या महाविकास आघाडी सरकारचा दबाव आहे की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांनी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे सांगितले होते. मात्र, 15 दिवसानंतर पोलिसांनी आमदारपुत्रासह चौघांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी उरण येथे असल्याचे समजले. पोलिसांच्या दोन टिम रवाना झाल्या. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपींनी उरण येथून वाकडी न्यु पनवेल येथील फार्म हाऊसवर गेल्याचा बनाव रचला. पोलिस पनवेल येथे गेले मात्र, आरोपी रत्नागिरीला गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर आरोपी कोळंबे येथील श्रमसाफल्य बंगला येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनसोडे, लांडगे, सल्लादुल्ला, पंध्ररी यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.










Leave a Reply