Pimpri crime news: दहावी पास बोगस डॉक्टरचे बिंग फुटले; आरोपी गजाआड

Pimpri crime news: दहावी पास बोगस डॉक्टरचे बिंग फुटले; आरोपी गजाआड

Pckhabar- वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर एक वर्ष उपचार करणाऱ्या दहावी पास असलेल्या बोगस डॉक्टरचे अखेर बिंग फुटल असून आरोपीला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात  खळबळ उडाली आहे.

अक्षय केशव नेहरकर (रा. बिजलीनगर चिंचवड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. विशाल भास्कर काटकर (वय ४९, रा. वरळी, कोळीवाड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरकर याने कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पदवी असल्याचे भासवले. वैद्यकीय कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनीस ई-मेलद्वारे रिझ्यूम पाठवला. त्यामध्ये बीएएमएस तसेच एमडी ॲपियर पदवी टाकून सिटी केअर हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, ओएनपी लीला हॉस्पिटल, ऑनेक्स हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे नमूद केले. तसेच मुलाखती दरम्यान डॉक्टर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पिंपरी-चिंचवड येथून पदवी घेतल्याचे सांगितले. पदवी प्रमाणपत्राची मागणी केली असता ते न दाखवता त्याने ओनेक्स हॉस्पिटल बिजलीनगर येथे सुमारे एक वर्षापासून डॉक्टर म्हणून नोकरी केली.

त्यानंतर नवीन नोकरीच्या शोधात अक्षय नेहरकर याने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स पिंपरी व पुणे विभाग यांच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर ५ फेब्रुवारीला रिझ्यूम पाठवला. त्याला पिंपरी कार्यालयात मुलाखतीसाठी बोलावले. त्यावेळी तो पदवीची कागदपत्रे सादर करू शकला नाही. तसेच तो डॉक्टर म्हणून नोकरी करीत असलेल्या हॉस्पिटलमधून संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे मोबदल्यासाठी अनेक प्रकरणे आली. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला संशय आला. त्यांनी आरोपीच्या पदवीबाबत संबंधित संस्थेकडे विचारणा केली असता अशी पदवी दिली नसल्याचे २५ मे २०२१ रोजी निष्पन्न झाले. त्यानुसार इन्शुरन्स कंपनीचे विशाल काटकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तसेच प्राथमिक तपासात आरोपी हा फक्त दहावी पास असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *