Interview With Dehuroad Cantonment Board CEO: कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन तिस-या लाटेसाठी सज्ज – रामस्वरूप हरितवाल
Pckhabar- कोरोनाच्या दुस-या लाटेत ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणार आहे. त्याकरिता प्लांट उभारण्याचे नियोजन सुरु आहे. सीएसआरमधून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी एक एजन्सी तयार असून त्यांच्यामार्फत प्लांट उभारण्यात येईल. संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु आहे. बेडची उपलब्धतता वाढविली जात आहे. कोरोनासाठीचे सर्व साहित्य उपलब्ध केले आहे. तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासन तयारी करत असल्याचे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी सांगितले. तसेच जास्तीत-जास्त लसीकरण करण्यावर आमचा भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देहूरोडमधील कोरोनाची परिस्थिती, प्रशासनाकडून केल्या जाणा-या उपाययोजना, रखडलेली निवडणूक याबाबत हरितवाल यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न – तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी काय नियोजन आहे?
उत्तर – तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार नियोजन करत आहोत. बेडची उपलब्धता आहे. बेडची आवश्यकता भासल्यास चिंचोलीतील शाळेत तयारी करुन ठेवली आहे. बेडची मागणी वाढल्यास तेथील सेंटर चालू केले जाईल. महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 100 बेडची सुविधा आहे. त्यामुळे बेडची कमतरता जाणवणार नाही. हॉस्पिटलमध्ये आयसीयू नाही. त्यासाठी जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे. देहूरोड परिसरात कोरोनावर उपचार करणारे चार खासगी हॉस्पिटल आणि बोर्डाचे एक हॉस्पिटल असे पाच हॉस्पिटल आहेत. बोर्डाचे हॉस्पिटल कोरोना समर्पित केल्याने मंगल कार्यालयांमध्येही ओपीडी चालू केली आहे. सर्व रुग्णांवर उपचार केले जातात. अॅन्टीजेन टेस्टिंग सेंटर तयार केले आहे. फिव्हर क्लिनिक तयार करुन ठेवले आहेत. कोरोनासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध ठेवले आहे. लॅबचेही साहित्य उपलब्ध केले आहे.
प्रश्न – दिवसभरात किती चाचण्या केल्या जातात?
उत्तर – देहूरोड परिसरात आजपर्यंत 2 हजार 654 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 2 हजार 447 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचे प्रमाण 90 टक्के आहे. मृत्यूदर सरासरी 1.9 टक्के राहिला आहे. रुग्ण दुपट्टीचा कालावधी पूर्वी जास्त होता. आता कमी झाला आहे. दिवसभरात 100 हून अधिक चाचण्या केल्या जातात. आजमितीला 147 सक्रिय रुग्ण आहेत.
प्रश्न – कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या ?
उत्तर – कोरोनाच्या पहिला लाटेचा यशस्वी मुकाबला केला. बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु केले. 30 बेडवरुन त्याची क्षमता वाढवून 50 बेडवर नेली आहे. दुस-या लाटेत ऑक्सिजन बेडची कमतरता भासली. तिथे 35 ऑक्सिजन बेड उपलब्ध करत आहोत. जास्तीत-जास्त लसीकरणावर भर देणार आहोत. त्यासाठी चार ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित केली आहेत. लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. त्यामुळे सर्व सेंटरमध्ये लसीकरण सुरु करु शकत नाही. लशींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण पूर्ण क्षमतेने करता येत नाही. परंतु, लस जशी उपलब्ध होईल. त्यानुसार जास्तीत-जास्त लसीकरणावर भर देणार आहोत.
प्रश्न : कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व प्रतिबंधासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
उत्तर – कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर आमचा भर आहे. त्यासाठी वॉर्ड निहाय पथकाची स्थापना केली आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, स्वयंसेवक यांचा समावेश आहे. या पथकाच्या माध्यमातून संबंधित वॉर्डातील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा केली जाते. चोवीस तासाच्या आत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्ण केले जाते. त्यावर आमचा फोकस आहे. त्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत इतर भागापेक्षा रुग्ण कमी आहेत. होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांनाही घरी जाऊन मोफत औषधे दिली जातात. चोवीस तास हेल्पलाईन सुरु केली आहे. यावर फोन करुन होम आयसोलेशनमधील रुग्ण सल्ला घेत आहेत. रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्यास आमचे डॉक्टर पुढील उपचाराचा सल्ला देतात. नागरिकांना हॉस्पिटलमध्ये येण्याची आवश्यकता भासू नये. अनेक लोक एकत्र येत असल्याने हॉस्पिटल कोरोना प्रसाराचे ठिकाण होतो. त्यासाठी पहिल्या लाटेत देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत सातही वॉर्डांमध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्याचा फायदा झाला. पण, रुग्णवाहिकेची कमतरता असल्याने दुस-या लाटेत करता आले नाही. रुग्ण सापडला की तत्काळ कंटेन्मेंट झोन घोषित केला जातो. आमची टीम जाऊन परिसर सॅनिटायझ करते.
प्रश्न – ऑक्सिजनचे कसे नियोजन करता?
उत्तर – दुस-या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तीन – चार इजन्सींकडून उपलब्ध करुन ऑक्सिजनची गरज भागवत आहोत. त्यासाठी मोठी तारांबळ होत आहे. बोर्डाच्या मालकीचा छोटा ऑक्सिजन प्लांट करण्याचे आम्ही नियोजन करत आहोत. त्याकरिता काही जणांशी संपर्क साधला आहे. सीएसआरमधून ऑक्सिजन प्लांट करण्यासाठी एक एजन्सी तयार आहे. त्याचे नियोजन सुरु आहे. प्लांट झाल्यानंतर तिस-या लाटेत ऑक्सिजनची कमरता भासणार नाही.
प्रश्न – झोपडपट्यांमध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे?
उत्तर – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झोपडपट्टीतील लोकसंख्या 15 हजाराच्या वर आहे. कोरोनाचा झोपडपट्टी भागात प्रसार होण्याची मोठी भीती होती. काही रुग्ण आढळले. परंतु, केलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविले. त्यासाठी पहिल्या लाटेत चारवेळा सर्वेक्षण केले. काही भागाला पूर्णपणे आयसोलेशन करत नागरिकांची अॅंटीजेन चाचणी केली. त्यामुळे कोरोना हॉटस्पॉट भाग नियंत्रणात राहिला.
प्रश्न – कोविडच्या लढाईसाठी पुरेसे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आहेत का?
उत्तर – पहिल्या लाटेत मनुष्यबळाची मोठी कमरता होती. फिजिशन मिळत नव्हते. त्यामुळे कोविड समर्पित रुग्णालय चालविण्यात अडचणी येत होत्या. आता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे काही अडचण नाही. पण, डॉक्टर काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्न येतो. खूप प्रयत्न करुन डॉक्टरांना उपलब्ध करुन घ्यावे लागत आहे.
प्रश्न – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आर्थिक परिस्थितीबाबत काय सांगाल ?
उत्तर – देशातील 62 कॅन्टोमेन्ट बोर्डांपैकी सर्वात गरीब कॅन्टोमेन्ट बोर्ड अशी देहूरोड कॅन्टोन्मेंटची परिस्थिती आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नाही. कर्मचा-यांचे वेतन देता येईल एवढाच ‘थँक फंड’ आहे. जीएसटीसह विविध प्रश्न असल्याने निधी उपलब्ध होत नाही. राज्य सरकार, जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळाला. त्यामुळे आम्ही काम करु शकत आहोत. राज्य सरकारकडे आणखी निधीची मागणी केली आहे. निधीशिवाय रुग्णांना मोफत उपचार, मोफत जेवण देवू शकणार नाहीत. निधीचा मोठा प्रश्न आहे. खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला विविध ठिकाणांहून निधी मिळतो. पण, देहूरोडला मिळत नाही.
प्रश्न – बोर्ड बरखास्त झाले आहे. त्यामुळे निर्णय घेताना माजी लोकप्रतिनिधींचे कितपत सहकार्य मिळते?
उत्तर – कोरोना लढाईमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व माजी सदस्यांचे मनापासून सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच अपुरे मनुष्यबळ व साधन सामुग्री नसतानाही लढाई सुरूच आहे. पाचपेक्षा जास्त रुग्ण सापडल्यास तत्काळ परिसर कंटेन्मेंट झोन करावा लागतो. काही ठिकाणी कंटेन्मेंट झोनला लोकप्रतिनीधींचा विरोध होतो. पण, समजावून सांगितल्यानंतर सहकार्य मिळते.
प्रश्न – निवडणूक कधी होईल?
उत्तर – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीबाबत आम्हाला कोणती माहिती आली नाही. महिलांचे आरक्षण नियमित प्रक्रियेचा भाग आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड पुनर्रचनेला मंजुरी उशिरा मिळाल्याने महिला आरक्षणास विलंब झाला. बाकीच्या बोर्डात आरक्षण काढले होते. नामनिर्देशित सदस्याचे नावपण पाठविले होते. तेही अद्याप आले नाही. संरक्षण विभागाचा तो निर्णय आहे. निवडणुकीची माहिती माझ्यापर्यंत येत नाही.
प्रश्न : कोरोना लढाईत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामगिरीबाबत काय वाटते ?
उत्तर – देहूरोड छोटे, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले बोर्ड आहे. स्थलांतरित नागरिकांची मोठी लोकसंख्या आहे. सुविधांची कमतरता आहे. क्वारंटाईन सेंटरसाठी इमारत मिळत नव्हती. विविध अडचणींवर मात करत बोर्डाचे कर्मचारी काम करत आहे. बाकी बोर्डापेक्षा आम्ही चाचण्याही जास्त केल्या आहेत. फिव्हर क्लिनिक, जेवण सर्व सुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे चांगले काम केले आहे. पण, आणखी चांगले काम होऊ शकत होते. अडचणींमुळे करता आले नाही. मनुष्यबळ, निधीचे मोठे प्रश्न आले. मनुष्यबळ असते तर कोविड समर्पित रुग्णालय तत्काळ सुरु केले असते. पण, मनुष्यबळाअभावी ते सुरु करण्यास विलंब झाला. व्हेंटिलेटर, आयसीयूची सुविधा असती. तर, मृत्यूदर आणखी कमी झाला असता. गंभीर रुग्णाला वायसीएमएच किंवा तळेगावला शिफ्ट करावे लागते. त्याचे अंतर मोठे आहे. महापालिका हद्दीतील विकासनगर, देहूगावमधील नागरिक चाचणीसाठी बोर्डाकडे येतात.
प्रश्न : देहूरोडकरांकडून काय अपेक्षा आहेत?
उत्तर : देहूरोडच्या जनतेने कोरोनाच्या संकटात प्रशासनाला सहकार्य केले आहे. यापुढेही असेच राहू द्यावे. प्रशासन चुकीचे काम करत आहे. यादृष्टीने बघू नये. आम्ही कमी मनुष्यबळात काम करत आहोत. कोरोनाने दोन कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. नियम नागरिकांसाठी आहेत. त्यांच्या सहकार्याशिवाय प्रशासन काहीच करु शकत नाही. त्यामुळे कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करने गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. एकदा साखळी तुटली. तर, कोरोना नक्कीच नियंत्रणात येईल.










Leave a Reply