Dehu News : पद्मश्री डॉ. सुहास मापुस्कर यांनी आरोग्य व स्वच्छता याविषयी समर्पित भावनेने केलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी -डॉ. शिल्पा मापुस्कर
*अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘जीवनगाथा’ उपक्रमांतर्गत प्रेरणादायी संवाद*
pckhabar – सृजन फाउंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, श्रीक्षेत्र देहू येथे ‘जीवनगाथा’ (Inspiring Biography) या उपक्रमांतर्गत इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पद्मश्री डॉ. सुहास मापुस्कर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा विशेष प्रेरणादायी संवाद शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. शिल्पा मापुस्कर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांचे महत्त्व विशद केले.
डॉ. शिल्पा मापुस्कर यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि परिपूर्णतेने करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. “प्रामाणिकपणा ही यशाची गुरुकिल्ली आहे,” असे सांगत त्यांनी जीवनातील नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

पद्मश्री डॉ. सुहास मापुस्कर यांच्या जीवनकार्याविषयी भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आपल्या वडिलांच्या आदर्शांचा वारसा घेऊन आपणही जीवनाची वाटचाल करीत आहोत. महात्मा गांधीजींच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी डॉ. सुहास मापुस्कर यांनी आपल्या संपूर्ण जीवनकार्यातून मनापासून प्रयत्न केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवून त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. वडिलांचे हे निरपेक्ष,सेवाभावी कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून, त्यांचा आदर्श घेऊन समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते, अशा अत्यंत भावस्पर्शी भावना डॉ. शिल्पा मापुस्कर यांनी व्यक्त केल्या.
टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे, पर्यावरणातील परिसंस्थेचे संरक्षण करणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणे हे पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे,” हा मोलाचा विचार मांडत त्यांनी समाजसेवेतील संवेदनशीलता आणि माणूसकीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. समाजात आरोग्य व स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी भजन, पथनाट्य यांसारख्या लोककलांचा प्रभावी वापर करणे, तसेच भिंतींवर आणि घरांवर स्वच्छतेविषयक घोषणा लिहिणे अशा विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
“कोणताही आजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वैयक्तिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे,” असा आरोग्यविषयक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जागरूक राहण्यासोबतच पर्यावरण संवर्धन आणि समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी स्पंदन भोर याने प्रमुख पाहुण्या डॉ. शिल्पा मापुस्कर यांचा परिचय करून दिला. आराध्या खंडाळे आणि वैष्णवी बाविस्कर या विद्यार्थिनींच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता सातवी मधील वैभवी डोळस हिने मुलाखतीचे सूत्रसंचालन केले, तर इयत्ता सातवीतील श्रीजय जाधव याने आभार प्रदर्शन केले.
‘जीवनगाथा’ उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणे, त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजवणे आणि समाजाप्रती जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हा आहे.
शाळेचे सचिव प्रा. विकास कंद, प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या सौ. शैलजा स्वामी आणि कार्यक्रम समन्वयक सौ. वृषाली आढाव व सौ. शीतल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.




Leave a Reply