Article By Dr. Ankush Jadhav : नैराश्याच्या आहारी जाऊ नका!

Article By Dr. Ankush Jadhav : नैराश्याच्या आहारी जाऊ नका!

Pckhabar- नैराश्य काही वेळा सावकाश तर काही वेळा अचानक येणारा एक घातक मानसिक आजार. आत्महत्ये एक प्रमुख कारण आहे नैराश्याचे. नैराश्य हा नवीन आजार नाही. पूर्वीपासून असणारा आजार आहे. अनेक दिग्गज लोकांनी नैराश्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. जगात दरवर्षी साधारणपणे ८ लाख लोक आत्महत्या करतात. परंतु कोरोनाच्या महासाथीत लोकांमध्ये सर्वच मानसिक आजारांचे विशेषतः नैराश्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाच्या महासाथीत जगभर नैराश्यामध्ये १६.५ टक्क्याने वाढ झाली आहे. एक सर्वेक्षणानुसार भारतात कोरोना पूर्वी नैराश्याग्रस्त ५७ दशलक्ष होते. कोरोनाच्या ताळेबंदी काळात ४ लाख ५७ हजार नवीन नैराश्याने ग्रासलेले रुग्ण निर्माण झाले आहेत तर जगात  साधारणतः २६४ दशलक्ष लोक नैराश्याने ग्रस्त आहेत.

नैराश्य, ज्याला इंग्लिश मध्ये डिप्रेशन म्हणतात. अनेक कारणांनी मनात निर्माण होणाऱ्या ताणतणावामुळे मनात अस्वस्थता निर्माण होऊन त्यातून बहुसंख्य लोक नैराश्याच्या आजाराला बळी पडतात.
सतत उदास वाटणे, उत्साह नसणे, दुःखी राहणे म्हणजे नैराश्य. साधारणतः दोन आठवडे वा त्यापेक्षा अधिक काळ उदास वाटणे, उत्साह कमी होणे,
आत्मविश्वास कमी होणे, थकवा जाणवणे, मन एकाग्र न होणे, झोप व भूक कमी वा जास्त होणे,
स्वत:त कमीपणाची भावना निर्माण होणे, आत्महत्येचे विचार मनात येणे, मनात नकारात्मक विचार येणे, दुःखी होणे इ.ही नैराश्य या मानसिक आजाराची लक्षणे आहेत. नैराश्याचे सौम्य, मध्यम व तीव्र असे तीन प्रकार आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आहे.
नैराश्यामध्ये जैविक,
मानसशास्त्रीय व सामाजिक कारणे असतात. कोणतेही बाह्य कारण नसताना सुद्धा नैराश्य येऊ शकते त्याला मेंदूत होणारे रासायनिक बदल (serotonin- सेरोटोनिन) कारणीभूत असतात. त्यालाच जैविक नैराश्य म्हणतात. सामान्यतः अनुवंशिकता, बेरोजगारी, कौटुंबिक वाद-विवाद, आवडत्या व्यक्तीचा मृत्यू, लहान वयातच झालेले मानसिक आघात, गंभीर अपघात, व्यसनाधीनता, प्रमाणापेक्षा अधिक झालेले कर्ज, मोठया प्रमाणात आलेले अपयश, चांगल्या परिस्थितीतुन अचानक आलेली गरिबी, प्रेमात आलेले अपयश, अचानक बेरोजगार होणे इ.अनेक कारणे असली तरी प्रत्यक्षात नक्की कोणाला कशाने नैराश्य येईल हे सांगणे कठीण आहे. कारण प्रत्येक व्यक्तीनुसार कारणे वेगवेगळी असतात.

नैराश्य हे कोणालाही,
कोणत्याही कारणाने येऊ शकते. नैराश्याने व्यक्तीच्या सर्वांगीण आयुष्यावर अनेक परिणाम होतात. त्याची सर्व प्रकारची उत्पादन क्षमता कमी होते, त्याची कार्यक्षमता कमी होते. त्याचा परिणाम केवळ कुटुंब, समाज यावरच न होता, देशाच्या विकास, प्रगतीवर परिणाम होतो. कोणत्याही प्रकारचे नैराश्य जेव्हा तीव्र होते तेव्हा आत्महत्येचे विचार बळावतात व परिणामी व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. नैराश्य हे आत्महत्येचे प्रमुख कारण आहे.

शारीरिक रोगांचा मनावर व मानसिक आजारांचा/ रोगांचा परिणाम शरीरावर होत असतो. पूर्वी मानसरोगावर उपचार कमी प्रमाणात होते. आता मानस उपचाराच्या सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध झाल्या आहेत. चांगली औषधे ही उपलब्ध आहे. यावर समुपदेशन चिकित्सा प्रभावी आहे. नैराश्याची सुरुवात जाणवताच मानस रोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. आपल्या जवळच्या मित्र, वडीलधारी वा स्वतःस योग्य वाटणाऱ्या व्यक्ती जवळ मन मोकळे करावे. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्यांना सांगाव्यात. कोणाजवळ तरी आपले दुःख बोलल्याने मन हलके होते. मनाने खंबीर व्हावे. आलेली सुख व दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेतते बदलत असते. हे मनावर बिंबवावें. उद्याचा दिवस चांगला असेल असा विचार करावा. अशी आशा करावी. कारण माणूस आशेवरच जगत असतो. जीवन खुष राहून जगायला शिका. कोणत्याही कारणाने त्वरित निराश होऊन आत्मघातकी विचार करू नका.

डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *