Maharashtra News : राज्यभरातील रेशन दुकानदारांचा संप स्थगित

Maharashtra News : राज्यभरातील रेशनधारकांचा संप स्थगित

उद्यापासून राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानं नियमितपणे उघडणार

Pckhabar- कोरोनाच्या संकटात रेशन दुकानदार जोखीम पत्करून धान्य वितरित करीत होते. कोरोनामुळे शहरातील काही रेशन दुकानदारांचा बळी गेला. त्यामुळे रेशन दुकानदारांनी कोरोना कालावधीत विमा संरक्षण कवच व आदी मागण्यांसाठी १ मेपासून गेली अकरा दिवस संपाचे हत्यार उगारले होते. मात्र, रेशनवरील धान्य वितरण बंद झाल्यामुळे याचा फटका गरीब, दुर्बल घटकांमधील शिधापत्रिकाधारंकाना बसत होता. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने देखील आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे कबूल केले. आठवडाभरत अक्षय्यतृतीय, रमजान ईदसारखा सणासुदीचा काळ आहे. रेशनधारकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनने ११ दिवसांचा संप अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या बुधवारी (दि. १२) पासून राज्यातील सर्व रेशन दुकानं नियमित उघडण्यात येतील, अशी माहिती फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, १ मे पासून राज्यभरात तब्बल ४८ जिल्ह्यातील सर्वच रास्त भाव दुकानदार संपावर गेले होते. राज्य सरकारने रेशन दुकानदारांना कोरोना कालावधीत विमा संरक्षण कवच द्यावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी धान्य वितरित करताना इ-पॉस मशिनवर शिधापत्रिका धारकांच्या ऐवजी रेशन दुकानदाराच्या बोटाचा ठसा घ्यावा, यासह विविध मागण्या रेशन दुकानदार संघटनेकडून करण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात अन्न नागरी पुरवठा सचिव विलास पाटील यांनी चार तारखेला संघटनेशी पत्रव्यवहार करून तुमच्या मागण्य रास्त आहेत. त्यावर विचारविमर्श सुरु आहे. लवकरच तुमच्या मागण्या मान्य होतील. तुम्ही दुकानं उघडा, असे आश्वासन दिले होते.

फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे विभागीय अध्यक्ष डोळसे पाटील, जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे व शिष्टमंडळाचे पदाधिकारी हे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले असता, ती होऊ शकली नाही. मात्र, माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट झाली. त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. त्यांना संघटनेचे म्हणणे पटले. ‘सविस्तर निवेदन भुजबळ साहेबांना देतो, प्रसंगी मागण्या मान्य करण्यासाठी मी त्यांची मनधरणी करतो’, असा शब्द त्यांनी संघटनेला दिला.

ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सहा विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत जनरल सेक्रेटरी बाबुराव मेमाने, पुणे विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, नाशिक विभागीय अध्यक्ष कोळसे पाटील, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष अशोक एडके, मुंबई विभागीय अध्यक्ष नवीनभाई मारू, कोकण विभाग अध्यक्ष शांताराम पाटील यांच्याशी संपाबाबत चर्चा करण्यात आली. सणासुदीचे दिवस आहेत. अक्षयतृतीय, रमजान ईद आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून संप अनिश्चित काळासाठी स्थगित करून उद्या बुधवारी (दि. १२) पासून राज्यातील सर्व रेशन दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला, असे या पत्रकात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे.

”आपला हा लढा संपलेला नाही. संप आपला मिटलेला नाही. तूर्तास स्थगित केलेला आहे. हा लढा अजून तीव्र होणार आहे. पुढील काही दिवसात राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व विभाग अध्यक्षांना विश्वासात घेऊन, चर्चा करून संपाबाबत पुढचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे राज्यातील सर्व दुकानदारांनी आपली रेशन दुकाने गोरगरिबांसाठी खुली करावीत. लोकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी”.
– गजानन बाबर – अध्यक्ष, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *