
Maharashtra political News : ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे पूर्ण!
Pckhabar- 23 नोव्हेंबर 2019 राज्याच्या राजकारणातील कधीही न विसरता येणारा दिवस… अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना दोन वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. राजभवनात माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकू शकली नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पुतण्या अजितदादांना आपल्याकडे येण्यास भाग पाडले अन् फडणवीस यांना 80 तासात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी 145 आमदारांची गरज होती. दुसरीकडे भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही म्हणत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी सुरू होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय डाव टाकून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव समोर केले.
तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु होती. त्याचबरोबर शेवटच्या अडीच वर्षासाठी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतही चर्चा सुरु होती, असं बोललं जात होते. त्यामुळे अजित पवार यांनी त्वरित देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मध्यरात्री BKCतील सोफिटेल हॉटेल मध्ये बैठक झाली आणि शपथविधी उरकण्याचा निर्णय झाला.
भाजपला बहुमतासाठी 40 आमदारांची गरज होती. भाजपचे 105, अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष असे 15 आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 38 आमदार असा बहुमताचा आकडा पार करता येईल, अशी फडणवीसांना आशा होती. मात्र ती केवळ आशाच राहिली. कारण, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे 23 नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचे फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरले. त्यांना अवघ्या 80 तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.











Leave a Reply