Dehu News : ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेल्या डॉक्टर मित्राच्या स्मरणार्थ 100 झाडांची लागवड
डॉक्टर मित्राला अनोखा पद्धतीने आदरांजली
स्तुत्य उपक्रमाचे होतेय कौतुक
Pckhabar- कोरोना आजारावरील उपचार सुरू असताना पुण्यातील एका खासगी रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्याने डॉ. प्रा. वैभव बबनराव सुलाखे यांचे काही दिवसांपुर्वी निधन झाले. आपल्या जिवलग मित्राच्या अशा जाण्याने श्रीक्षेत्र देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव खूपच अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या काही मित्रांच्या मदतीने डॉ. वैभव यांच्या स्मरणार्थ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 25 हजार रूपयांची 100 झाडांची देहूगाव परिसरात लागवड केली. हे वृक्ष अनंतकाळ या विश्वाला प्राणवायू देतील… प्राणवायू अभावी कोणाचेही प्राण भविष्यकाळात जाऊ नये, या भावनेतून ही झाडे लावण्यात आली आहे. डॉ. यादव आणि त्यांच्या मित्रांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.
डॉ. किशोर मधुकर यादव आणि स्व.डॉ. प्रा.वैभव बबनराव सुलाखे यांची वैद्यकीय शिक्षण घेत असताना गट्टी जमली. डॉ. यादव आणि डॉ. सुलाखे यांनी संपूर्ण वैद्यकीय शिक्षण एकत्र पूर्ण केले. नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरामध्ये असूनही त्यांची मैत्री कायम होती. त्यांच्यामध्ये कौटुंबिक स्नेह होता. काही दिवसांपुर्वी डॉ. प्रा.वैभव बबनराव सुलाखे यांना कोरोनाचे निदान झाले होते. त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका नामाकिंत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते उपचारालाही चांगला प्रतिसाद देत होते. 3-4 दिवसांमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र, रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डॉ. सुलाखे यांचा ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला अन् यामध्येच डॉ. सुलाखे यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, दोनच दिवसांपुर्वी आपल्या मित्राला समक्ष भेटून आलेल्या डॉ. किशोर यादव यांना आपला मित्र अशा पध्दतीने गेल्याचे अतिशय दुःख झाले.
यामुळे बैचेन झालेल्या डॉ. यादव यांनी आपल्या जिवलग मित्राच्या स्मरणार्थ झाडे लावण्याचा संकल्प केला. याबाबत त्यांनी आपले मित्र गुप्तवार्ता अधिकारी डॉ. युवराज चव्हाण, लोहगाव येथील डॉ. उमेश जैस्वाल, जळगाव येथील डॉ. प्रशांत गर्ग, बीड येथील डॉ. आगाखान पठाण, उपजिल्हाधिकारी डॉ. भगवान आगे-पाटील, औरंगाबाद येथील डॉ. ज्ञानेश्वर मोकाटे, नांदेड येथील डॉ. विकास वाठोरे, डॉ. परमेश्वर तिडके, डॉ. सत्यजित कर्हाळे, डॉ. रोहिणी ठक्करवाड, निजामाबाद येथील डॉ. निरूपा ऐंलोड, पुण्यातील डॉ. लक्ष्मी वापराणी, डॉ. सपना भोसले, केज येथील डॉ. ज्ञानेश्वर टोपे, परभणी येथील डॉ. इकबाल शेख, सोनपेठ येथील डॉ. मन्मथ महाजन, अमरावती येथील वित्त व लेखाधिकारी डॉ. प्रकाश दासे, उमरखेड येथील डॉ. शिवानंद कवाणे, यवतमाळ येथील डॉ. निखिल चव्हाण, कोल्हापूर येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन यत्नाळकर, भंडारा येथील डॉ. मिलिंद राऊत, हदगाव येथील डॉ. सुभाष नाईक, बुलढाणा येथील डॉ. स्वाती केंद्रे, वैजापुर येथील डॉ. संतोष संघवी, डॉ. सारिका गोरे-आगलावे, डॉ. अंजली जाधव, डॉ. सोनल पंडित यांच्याशी संवाद साधला. आणि पर्यावरण दिनानिमित्त 100 झाडे लावली.
देहूगावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या अभंग प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येणार असल्याची डॉ. यादव यांना माहिती मिळाली. त्यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधून 100 झाडे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे 25 हजार रूपये दिले. त्यामध्यमातून अभंग प्रतिष्ठानने 100 झाडे आणून तीर्थक्षेत्र देहू परिसरात याची लागवड केली.
याबाबत प्रा. विकास कंद आणि माजी उपसरपंच सचिन कुंभार म्हणाले, ’’डॉ. किशोर यादव यांनी आणि त्यांच्या मित्र परिवाराने आपल्या मित्राच्या स्मरणार्थ 100 झाडे लावली. हे वृक्ष अनंतकाळ या विश्वाला प्राणवायू देतील. प्राणवायूच्या अभावी कोणाचेही प्राण भविष्यकाळात जाऊ नये यासाठी आपण संवेदनशीलतेने काम करायला हवे ही भावना एक सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणारे डॉक्टर म्हणून यादव यांच्या मनातून व्यक्त होत आहे. डॉ. यादव आणि त्यांच्या मित्रांनी निश्चितपणे समाजमनाला नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या मित्राच्या आठवणी या झाडांच्या माध्यमातून कायम राहणार आहेत.’’
श्रीक्षेत्र देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ डॉ. किशोर यादव म्हणाले, ’’डॉ. प्रा. वैभव सुलाखे याच्या जाण्याने अतिशय दुःख झाले आहे. वैभवने सुख दुःखात कायम साथ दिली. वैभवबरोबर पुण्यात बराच कालावधी एकत्र घालवला. रात्री उशिरापर्यंत आम्ही अभ्यास करायचो, गप्पा मारायचो, चहा, आईस्क्रीम पार्ट्या करायचो. वैभवबरोबर अनेक आठवणी आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत वैभवला विसरू शकणार नसल्याने डॉ. यादव म्हणाले”.
डॉ. प्रविण अभंग म्हणाले” अडी- अडचणीच्या काळात वैभव नेहमी एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे सदैव उभा राहत असे”.
डॉ युवराज चव्हाण म्हणाले” आम्ही सर्व वैभवचे मित्र ज्यावेळी देहूतून जाताना ती झाडे पाहू त्यावेळी या झाडांची सावली व स्वतः उन्हाच्या झळा सोसून सदैव इतरांना प्रेमाची सावली देणारी झाडे पाहून वैभवच्या सुखद आठवणी आमच्या मनात चिरंतन राहतील. आमचा मित्र या झाडांपेक्षा वेगळा नव्हता”.
डॉ परमेश्वर तिडके म्हणाले” मी, वैभव आणि किशोर यांनी बराच काळ एकत्र होतो. त्याच्या अनेक आठवणी आहेत. आमचा मित्र एवढ्या लवकर एक्झिट घेईल असे कधीही वाटले नव्हते. वैभव कायम स्मरणात राहील”.
डॉ लक्ष्मी वापराणी म्हणाल्या ” स्वतःच्या अडचणी न सांगता इतरांच्या अडचणी सोडवण्यासाठी धावून जाणारा असा वैभव मित्र होता. त्यांच्या जाण्याने वैभवच्या परिवाराबरोबर सर्व मित्रांचे मोठे नुकसान झाले आहे”.
डॉ. आगाखान पठाण म्हणाले” रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीचे नातं किती मोठं असतं हे प्रत्यक्ष जगण्यातून वैभव आम्हाला शिकवून गेल्याचे ते म्हणाले.’’
प्रिय मित्राच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून सर्व मित्रांनी मित्राला अनोख्या पध्दतीने आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे देहू परिसरात कौतूक होत आहे.









Leave a Reply