Pune News : छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित करण्याची मागणी

Pune News : छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित करण्याची मागणी

मावळ्याच्या वेषात घोड्यावर येऊन पोपट खोपडे यांनी दिले तहसीलदारांना निवेदन
Pckhabar-स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित करावे, तसेच त्यांची प्रतिमा सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात यावी, अशी मागणी नवल फाउंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव खोपडे यांनी केली.

   स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला हा वेल्हे तालुक्यात असल्याने, वेल्हे तालुक्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा आणि आपल्या मागण्यांचे निवेदन खोपड यांनी दिले.

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले पराक्रम, त्यांची कीर्ती, निती, राष्ट्रकार्य लक्षात घेऊन त्यांची गणना राष्ट्रपुरुषाच्या यादीत व्हायला हवी. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा लावण्याबाबत शासनाने अध्यादेश काढावेत. या विषयीचा ठराव विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये मांडून एकमताने मंजूर करावे, अशी मागणी पोपटराव खोपडे यांनी केली आहे.

 राज्यातील राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये सध्या 37 राष्ट्रपुरुषांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजासारख्या चारित्र्यवान, नितीवंत, स्वराज्य रक्षक, महापराक्रमी राजाचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत नसल्याची खंत आम्हा मावळातील लोकांमध्ये असल्याने याबाबतचे निवेदन वेल्हे तहसीलदारांना दिले.

यावेळी योगेश खोपडे, सचिन खोपडे, संतोष खोपडे, कानिफनाथ खोपडे आणि रोहन खोपडे आदी उपस्थित होते. कोरोना नियम सोशल डिसटन्सचे सर्व नियम पाळून समस्थ खोपडे परिवाराच्या वतीने हे निवेदन वेल्हे तहसीलदारांना देण्यात आले. विशेष म्हणजे पोपट खोपडे हे निवेदन देण्यासाठी मावळ्याचा वेश परिधान करून घोड्यावर बसून आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *