Rajgad Fort News : राजगडावर अनमोल अशा ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा सापडला

Pckhabar- गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ओळख असलेल्या राजगडावर अनमोल अशा ऐतिहासिक पेशवे आणि ब्रिटिशकालीन नाण्यांबरोबरच तलवार, महालक्ष्मीची मूर्ती, लोखंडी तोफ गोळ्यासह अनेक वस्तू सापडल्या आहेत.
याबाबत सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी माहिती दिली.
सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सध्या गडकिल्यांवर पर्यटक जात नाहीत. त्यामुळे हीच संधी समजून पिंपरी – चिंचवड मधील गडप्रेमी तरुणांनी लॉकडाउनच्या काळात राज्यातील गडकिल्यांची स्वच्छता आणि संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या गड-किल्ले कार्यात 100 पेक्षा अधिक तरुण तरुणी सहभागी झाले आहेत.
याच मोहिमेदरम्यान राजगडावर स्वच्छता अभियान सुरू होते. या अभियानात ऐतिहासिक पेशवे आणि ब्रिटिशकालीन नाण्यांबरोबरच तलवार, महालक्ष्मीची मूर्ती, लोखंडी तोफ गोळ्यासह अनेक वस्तू सापडल्या आहेत. हा महत्वपूर्ण ठेवा मिळाल्याने तरुणांनी बेल, भंडारा उधळत आपला आनंद व्यक्त केला.
राजगडावर सापडलेल्या या सर्व वस्तू पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहे. यावर योग्य संशोधन झाल्यास इतिहासातील अनेक महत्वपूर्ण घटनांचा उलगडा होईल अशी आशा दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.










Leave a Reply