Article By Profesor Pradeep Hivarkar: पिपल्स प्रेसिडेंट, आजन्म विद्यार्थी व शिक्षकांची भूमिका निभावणारे ‘डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम’

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

वाचन प्रेरणा दिवस आणि जागतिक विद्यार्थी दिवसानिमित्त प्रा.प्रदीप बबन हिवरकर यांचा विशेष लेख

Pckhabar- भारताला अणुशक्ती सज्ज बनविणारे सळसळते व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डॉ. ए. पी. जे कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यात रामनाथापूरम जिल्ह्यात रामेश्वरम (धनुषक्कोडी)येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलबददीन अब्दुल कलाम. कलाम यांनी स्वतः आपल्या नावासमोर ए म्हणजे पणजोबा यांचे नाव आबुल, पी म्हणजे आजोबांचे नाव पाकीर जे म्हणजे वडिलांचे नाव जैनुलबद्दीन. डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम. आईचे नाव ‘आशियम्मा ‘प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आनंदी व समाधानी राहून ध्येयाकडे वाटचाल करीत राहायचे ही शिकवण आईने दिली. वडीलांची अतिशय साधी राहणी पण उच्च विचार चैनीच्या वस्तू अजिबात नाही. विलक्षण ऊर्जा, वेळेचे अचूक नियोजन, हा वडिलांचा स्वभाव. स्वाभिमान व कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक राहणे हा त्यांचा स्वभाव. यात्रेकरूंना बोटीने रामेश्वरम ते धनुषक्कोडी पोहोच करायचे हा वडिलांचा व्यवसाय. पण नियती किती कठोर असते पहा एक दिवस बोट वादळामुळे बुडाली. तरीसुद्धा वडील खचले नाहीत. अब्दुल हे सर्व पाहत होता. वडिलांची कष्टाळूवृत्ती याचा मात्र त्यांना खूप अभिमान वाटत असे. शाळेत रामनाथा हा ब्राम्हण मित्र रामनाथा व अब्दुल एका बाकावर बसायचे धर्म व जात मानायची नाही याची शिकवण आई ,वडील यांच्याकडून मिळाली . क्रोध मानवाच्या प्रगतीला कसा बाधक आहे आणि उत्तम बोल, नम्रता, विनयशीलतेमुळे परिस्थिती बेताची असली तरी घरात आनंद, स्वास्थ्य कसे राखता येते ,एकमेकांचा आदर कसा राखता येतो याविषयी घरातील एक उत्तम उदाहरण , प्रसंग त्यांनी सांगितला.

एके दिवशी अनेक कामं आणि त्यामुळे घाईत आई आशिअम्मा यांनी भाकरी बनविताना ती करपली गेली . संध्याकाळी जेवण चालू असताना ती भाकरी माझे वडीलांना वाढली गेली . माझ्या आईच्या लक्षात आल्यावर आईने वडिलांची माफी मागितली. यावर वडील म्हणाले मला करपलेली भाकरी खूप आवडते .मला खूप विशेष वाटले .जेवण झाल्यावर मी पुन्हा विचारले ,’खरेच तुम्हाला करपलेली भाकरी आवडते’ यावर वडिलांनी दिलेले उत्तर मला आजन्म चांगुलपणा, विनयशीलता , समोरच्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत दुःख द्यायचे नाही. ही शिकवण देऊन गेली ते म्हणाले, तुझी आई आपल्यासाठी खूप कष्ट करते अशा वेळी शुल्लक गोष्टीसाठी तिला दुःख देणे मला रुचत नाही. ही शिकवण मी आजन्म विसरलो नाही. तशी परिस्थिती बेताचीच समुद्रात छोटे मासे पकडून विकायचे, रोज वर्तमान पत्र घरोघरी टाकायचे अशी कामे करीत शिक्षण घेत. बालपणी आकाशातील उंच पक्षी आकाशात झेप घेतो पुन्हा खाली येतो. याचे ते बारकाईने निरीक्षण करीत. यातूनच त्यांना भारतीय वायुसेनेत वैमानिक होण्याचे स्वप्न बळावले. पण 8 जागांपैकी 9 वा क्रमांक आल्याने त्यांची वैमानिक (पायलट) बनण्याचे स्वप्न अपूरे राहिले . त्यांचा जवळचा ब्राम्हण मित्र रामनाथा शास्त्री व डॉ. कलाम लहानपणी रामेश्वरम मधील शेजारीच राहणारे शिक्षक , माजी क्रांतिकारक ‘एस. टी. आर. माणिकम’ यांचेकडे जात व तिथेच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्यांनीच वाचनाची आवड निर्माण केली.

वाचनाने एकाग्रता, ज्ञानसंवर्धन, मनोरंजन होते. चांगले विचार, सत्कर्म, सद्गुण, वैज्ञानिक दृष्टिकोण हे वाचनातून मिळते. ग्रंथामध्ये आयुष्याला सुंदर आकार देण्याचे सामर्थ्य आहे .मनाच्या गाभाऱ्यात ग्रंथामुळे सुवास नेहमी दरवळत असतो. ग्रंथामुळे मनाची प्रसन्नता, एकाग्रता वाढते. मनामध्ये सात्विक विचारांची पेरणी करायची असेल तर ग्रंथ वाचले पाहिजे. चरित्रे व उत्तम शील कसे राखावे याचे ज्ञान हे ग्रंथ देतात. वाचन, शिक्षण, यामुळे आत्मसन्मान मिळतो. हे डॉ. कलाम यांनी जाणले. एक चांगला विचार कित्येक वाईट विचारांना बाजूला ठेवण्याचे काम वाचन संस्कृती करते. वाचन प्रेरणा दिवस व जागतिक विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांचे चरित्र प्रत्येक भारतीयांनी अभ्यासले पाहिजे व वाचन संस्कृती रुजवली पाहिजे. शिक्षण, विवेक, चिकित्सा यावर त्यांचा विश्वास होता व आजन्म त्यांनी त्याचा युवा वर्गामध्ये प्रसार केला.

एखाद्या महनीय व्यक्तीच्या परिसस्पर्श व वाचन संस्कृती सुद्धा जीवनाला कसा आकार देतो बघा डॉ. कलाम डी. आर. डी. ओ.(संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) मध्ये कार्यरत असताना ‘काथिरेसान ‘नावाचा ड्राइव्हर होता. त्याला डॉ. कलाम यांनी पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. काथिरेसान आज समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवून पेरिग्नार विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. चांगली माणसं सुध्दा जीवनात येणं आपलं भाग्य असतं आणि त्यांना आपल्या जीवन प्रवासात जपून ठेवणं ही सुद्धा आपली योग्यता सिध्द करते.याची प्रचिती यावरून येते.
डॉ. कलाम म्हणतात.

FAIL म्हणजे First attempt in learning.
END – म्हणजे Effort never dies.
NO -म्हणजे Next opportunity.
तुम्हाला स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगायचे असेल तर…
If you Salute your duty
No need Salute to anybody,
If you pollute your duty
You have salute everybody.
ही शिकवण ते देतात .
कमालीचा साधेपणा, प्रखर राष्ट्रनिष्ठा, परिस्थिती कमकुवत असली तरी दिवस पालटण्याची किमया माझ्याकडे आहे. जो अभाव , संघर्ष के बीच आगे बढते है , वही जीवन में आगे बढते है | हा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्याकडून मिळतो. स्वतःवर विश्वास, क्षमतांवर आपला दृढ विश्वास पाहिजे तरच ध्येय गाठण्यासाठी व त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. सतत कार्यमग्न म्हणजे मानवाच्या जीवंतपणाचे लक्षण आहे. यावर त्यांची श्रद्धा होती.

डॉ. कलाम DRDO(Defence Research and Development) वैज्ञानिक सल्लागार व संचालक असताना अर्जुन टॅंक, लाईट कॉंबॅट एअरक्राफ्ट ची निर्मिती केली.
ISRO- 1963 मध्ये(Indian Space Research Organisation) भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये कार्यरत असताना एस. एल. व्ही.(सॅटेलाईट लाँचिंग व्हेईकल) 1982 मध्ये रोहिणी उपग्रह प्रक्षेपण यासारखे अनेक प्रक्षेपण प्रक्षेपित करण्यासाठी आपल्या सहकारी वैज्ञानिकांच्या मदतीने देशाच्या संरक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले.
मे 1974 (पंतप्रधान इंदिरा गांधी)व मे 1998 मध्ये (पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी)यांच्या कार्यकाळात स्वसंरक्षण व ऊर्जेची गरज हा उद्देश निश्चित करून राजस्थान राज्यात जैसलमेर जिल्ह्यात पोखरण येथे अणुचाचणी केली यात डॉ. कलाम प्रमुख होते.त्यांचे संरक्षण क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे.

डॉ. कलाम यांची साहित्य संपदा
इंडिया माय ड्रीम
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट
टर्निंग पॉइंट
दीपस्तंभ
अ मेनोफेस्टो फॉर चेंज
अ व्हिजन फॉर टुमारोज
विंग्ज ऑफ फायर
इंडिया 2020-(भारत 2020:नव्या सहस्रकाचा भविष्यवेध)
Ignited minds
राष्ट्राच्या उभाणीत शिक्षकाचे योगदान व भूमिका याविषयी ते म्हणतात,
“एक डॉक्टर भ्रष्ट झाला तर एका रुग्णाचा मृत्यु होईल;
एखादा इंजिनिअर भ्रष्ट झाला तर एखादा पूल कोसळेल
पण एखादा शिक्षक भ्रष्ट झाला तर बलशाली भारताच्या कित्येक पिढ्या अंधारात जातील.”
हे ओळखून त्यांनी आपल्या राष्ट्रपती कालावधीत 5 सप्टेंबर 2005 रोजी शिक्षकदिनी नवी दिल्ली येथे गुणवंत शिक्षकांचा गौरव केला. त्या समारंभात त्यांनी भावपूर्ण शब्दांत शिक्षकांना इंग्रजीत शपथ दिली. तिचा मराठी अनुवाद पुढे देण्यात येत आहे .भारतातील सर्व शिक्षकांना दश:सूत्री प्रतिज्ञा दिली. ती पुढीलप्रमाणे… 1.सर्वप्रथम मी अध्यापनावर मनःपूर्वक प्रेम करीन. अध्यापन हे माझे जीवनसर्वस्व असेल. 2 केवळ माझा विद्यार्थ्यांचेच नव्हे तर अखिल विश्वातील गुणवान व चैतन्यशील युवा वर्गाचे उद्बोधन करणे ही माझी जबाबदारी आहे .याची मला पूर्ण जाणीव आहे व म्हणून मी स्वतःला अध्यापनाच्या पवित्र अशा माझ्या जीवितकार्याला पूर्णपणे वाहून घेईन.
3.सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यालाही अध्ययनात उज्जवल यश लाभावे यासाठी मी मनःपूर्वक प्रयत्न करीत राहीन व त्यात यशस्वी झाल्यास स्वतःला शिक्षक म्हणून घेण्यात मला सार्थ अभिमान वाटेल.
4.विद्यार्थ्यांपुढे वस्तुपाठ राहावा अशाच प्रकारे मी माझे जीवन व्यतीत करीन.
5.विद्यार्थ्यांच्या उपजत चौकस बुद्धीचा विकास व्हावा यासाठी त्यांनी आपल्या शंका व प्रश्न विचारावेत, म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देईन. त्यायोगे त्यांच्या भावी जीवनात ते ज्ञानसंपन्न व सर्जनशील भावी नागरिक म्हणून वावरतील.
6.सर्व विद्यार्थ्यांशी मी सदैव समत्वबुद्धीने वागेन. धर्म, जात,भाषा इत्यादींच्या आधारावर मी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव किंवा पक्षपात करणार नाही.
7. मी सदैव अध्यापनक्षम राहण्याचा प्रयत्न करीन .त्यायोगे मी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना सर्वात उच्च दर्जाचे शिक्षण देऊ शकेन.
8.अध्यापकाचा पेशा स्वीकारून मी राष्ट्रउभारणीच्या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावत आहे.
9.मनात सदैव पवित्र विचार बाळगून यानुसार मी माझे दैनंदिन आचरण ठेवीन. माझ्या आचरणातून विद्यार्थ्यांवर संस्कार घडणार याचा विचार सदैव बाळगीन व त्यासाठी आचार-विचार-उच्चार यांचे पावित्र्य कटाक्षाने पाळीन.
10.माझ्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचे मी सदैव मनःपूर्वक कौतुक करीन.(संदर्भ -मराठी अनुवाद श्री. सुधाकर प्रभुदेसाई)

10 जून 2002 NDA (National Democratic Alliance) आदरणीय अटलबिहारी वाजपेयी सरकार ने 11 व्या राष्ट्रपती पदासाठी डॉ. कलाम यांना उमेदवार म्हणून घोषित केले. त्यांच्या विरोधात कॅप्टन लक्ष्मी सहगल राष्ट्रपती पदासाठी उभ्या होत्या. त्यावेळी डॉ. कलाम यांना 9,22,884 मते तर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना 1,07,366 मते मिळाली .अर्थात कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे कर्तृत्व सुद्धा काही कमी नव्हते.
राष्ट्रपती पदाची शपथ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय बी. एन. कृपाल यांनी संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये दिली. या शपथ विधीसाठी डॉ. कलाम यांच्या आग्रहास्तव 100 मुलां-मुलींना या खास समारंभात निमंत्रित करण्यात आले होते. या अभूतपूर्व शपथ विधी समारंभ या 100 मुलां-मुलींना पाहण्याचे सद्भाग्य मिळाले. राष्ट्रपती पद स्वीकारताना त्यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, दहशतवाद, बेरोजगार ,जात -पात भेदभाव यावर लक्ष वेधले. वैज्ञानिक दृष्टीकोन, संरक्षण, कौशल्यधारीत शिक्षण पद्धती, उद्योग, व्यवसाय या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करण्याचे जाहीर केले.यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
यानंतर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पध्दती असलेल्या बहुभाषिक, बहुधर्म असलेल्या भारत देशाचे 18 जुलै 2002 पासून 11 वे राष्ट्रपती(प्रथम नागरिक) म्हणून निवडून आले.2002 -2007 हा राष्ट्रपती कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ते शांत बसले नाही. इंदोर, शिलॉंग, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी IIT व IIM च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते .

अखेरच्या दिवशी ‘पी. ए. सृजनपाल सिंह’ म्हणाले ,साहेब आपण,भारतरत्न, राष्ट्रपती ,वैज्ञानिक, लेखक,मिसाईल मॅन ,शिक्षक, विचारवंत आहात तुम्हाला स्वतः विषयी कोणती ओळख आवडेल.
त्यावेळी लगेच उत्तर दिले, ” Teaching is nobel profession that shapes Character caliber & the future of an individual If the people remember me as good teacher. that Will be the biggest honour for me.” 
मंडप कितीही मोठा असला तरी त्याला झालर असल्याशिवाय शोभा नाही. तसा माणूस कितीही मोठा असला तरी माणुसकी असावी लागते.त्यांचे अंत:करण विशाल, उदार होते.
27 जुलै 2015 रोजी मेघालय ची राजधानी शिलॉंग येथे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट ‘महाविद्यालयात विद्यार्थ्यांना Creating a livable Planet earth या विषयावर मार्गदर्शन करताना सायंकाळी 6.35 वाजता हृदयविकाराचा झटका आला .आणि थोड्याच वेळात बेथेमी हॉस्पिटलमध्ये या देवमाणसाने सायंकाळी7.45 वाजता अखेरचा श्वास घेतला.
त्यावेळी दि. न्यूयार्क टाईम्स ने पुढील शब्दात आदरांजली वाहिली…
भारत देशाच्या अणुकार्यक्रमातील सळसळते नेतृत्व म्हणजे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम बाह्य देशांच्या वर्चस्वाच्या भितीमधून भारत देशाला बाहेर काढणे आणि स्वतःची लष्करी ताकद उभी करण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आज अनेक क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण दलामध्ये कार्यरत आहेत.
कमालीचा साधेपणा हे हिमालयापेक्षा उत्तुंग असलेल्या कलाम साहेबांचे वैशिष्ट्य रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून 22 सप्टेंबर 2013 रोजी सकाळी 11 वाजता कर्मवीर समाधी परिसर पोवई नाका, सातारा. येथे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कलाम साहेब यांची ‘I will fly ‘ही कविता आजही रोमांचित करते. ती कविता अगदी जवळून ऐकण्याची सुवर्ण संधी मला मिळाली( पास क्रमांक-174 )हा माझा अविस्मरणीय व अद्वितीय क्षण होता तो आजही मला प्रेरणादायीच आहे.
ही कविता अगदी अंतःकरणपूर्वक हजारो विद्यार्थ्यांना स्वजणीव,आत्मभान, आंतरिक प्रेरणा , उर्जा,सर्जनशील, चिकित्सकता निर्माण व्हावी, तसेच माझ्या भारताचा प्रत्येक युवा जबाबदार, सर्जनशील,प्रयोगशील, निर्माण व्हावा ,जन्माला येऊन काहीतरी अद्वितीय कार्य करा .आपली व आपल्या भारताची नवी ओळख निर्माण व्हावी , देशाच्या प्रगतीसाठी नवयुवकांमध्ये चेतना निर्माण व्हावी .यासाठी ते म्हणून घेत होते .त्यांच्या प्रत्येक श्वासागणिक ,संशोधक वृत्ती ,सुसंस्कृत ,चारित्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन व बलशाली भारताचे स्वप्न समोरील विद्यार्थ्यांमध्ये ते पाहत होते.कवितेतील प्रत्येक शब्द ते बारकाईने विद्यार्थ्यांसमोर मांडत होते.
I will Fly…
I am born with potential.
I am born with goodness & Trust.
I am born with ideas & dreams.
I am born with Greatness.
I am born with Confidence.
I am born with wings.
So I am not for crawling.
I have wings
I will fly
I will fly 
I will fly
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमता व बलस्थानाची जाणीव ते करून देत होते.आपल्या प्रत्येकामध्ये जन्माला येताना अग्निबिंदू चा अंश अंतरात असतो फक्त त्या अग्निला योग्य दिशा, प्रेरणा, मार्गदर्शन,भावनिक व मानसिक आधार गरजेचा असतो. याची जाणीव ते पालक, समाज, शाळा, शिक्षक यांना करून देत होते .यासाठी ते नेहमी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत, त्यांना प्रेरित करणे हाच त्यांचा आवडता छंद. डॉ. कलाम यांचे बालपण अथक परिश्रम व हलाखीचे होते मात्र त्यांनी त्याचा उल्लेख मात्र केला नाही. पण सतत विद्येची साधना करीत राहिले. त्यामुळेच बोट चालविणाऱ्या माणसाचा मुलगा विद्येच्या बळावर, अथक परिश्रमाच्या बळावर पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती, मिसाईल मॅन, एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात.
आज डॉ. कलाम हयात असते तर 15 ऑक्टोबर 2020 रोजी 90 वा वाढदिवस अभिष्टचिंतन साजरा केला असता .
आयुष्यभर पुण्याईची उधळण करणारा,संशोधक वृत्ती जगवण्यासाठी अहोरात्र वाहून घेणारा देवमाणूस आज आपल्यात नाही याची खंत आज वेदनादायी वाटते .
भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2015 मध्ये बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीजवळ असलेल्या व्हीलर आयलँड चे नामकरण ‘डॉ.अब्दुल कलाम आयलँड ‘असे केले आहे .हा सुध्दा त्यांचा सर्वोच्च सन्मानच आहे.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा दिवस जन्मदिवस महाराष्ट्रात वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
भारताचे लाडके व रिअल हिरो, मिसाईल मॅन ,भारतरत्न,जनतेचे राष्ट्रपती, वैज्ञानिक, इंजीनिअर, प्राध्यापक, लेखक,एक अद्वितीय तारा, ऊर्जास्त्रोत, प्रेरणास्त्रोत,एक दीपस्तंभ,विशेष म्हणजे एक खरा व चांगला माणूस (क्लास वन माणूस)अखेरच्या श्वासापर्यंत विद्यार्थी व शिक्षकांची भूमिका निभावणारे व प्रत्येक भारतीयांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोण निर्माण करणारे, माता पिता आणि गुरूचा त्याग आपल्या देशाची नवी उंची निर्माण करेल अशी आजीवन चेतना देणारे भारताचे रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सर यांना रयत शिक्षण संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन…!

रयत शिक्षण संस्थेचे,
महात्मा फुले अध्यापक विद्यालय, सातारा.
प्रा.प्रदीप बबन हिवरकर
भ्रमणध्वनी-777 489 66 32
Pradeephivarkar8@gmail.com

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *